मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १७ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तिचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून महत्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. मराठी भाषा विभागाने मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मराठी भाषा विभागाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सहसचिव नामदेव भोसले, भाषा संचालक विजया डोणीकर, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर आणण्याच्या गरजेवर भर दिला. ” जागतिक स्तरावरील मराठीप्रेमी यांना साहित्याची ओळख व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. दृकश्राव्य स्वरूपात साहित्य उपलब्ध झाल्यास ते सहजतेने लोकांपर्यंत पोहोचू शकेल,” असे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी सुमारे ५०० बृहमंडळे कार्यरत आहेत. या बृहमंडळांमार्फत मराठी साहित्याचा प्रसार होण्यासाठी प्रत्येक बृहमंडळाला ५०० मराठी पुस्तके प्रदान करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यामुळे परदेशातही मराठी भाषेची गोडी वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. परदेशात ज्याठिकाणी बृहन महाराष्ट्र मंडळ आहेत तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत विभागाने कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मराठी भाषा जतन, संवर्धन व प्रचारासाठी विविध आधुनिक उपक्रम राबवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी केल्या. मराठी भाषा येत नसलेल्या नागरिकांना मराठीबद्दल माहिती व्हावे,यासाठी रेल्वे स्थानके, बस स्थानके इत्यादी ठिकाणी क्यू आर कोड तयार करावेत. मराठीची जास्तीत जास्त पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केली.
0000