मत्स्य व्यवसाय विभागात नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या वापरासाठी नाविन्यता सोसायटीच्या सहयोगातून ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ उपक्रम मंत्री नवाब मलिक, अस्लम शेख यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा शुभारंभ
मुंबई, दि. १० – कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ उपक्रमाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते आणि मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. मत्स्य व्यवसाय विभागातील समस्या जाणून घेणे आणि त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मासे पकडणे, उत्पादन आणि मासे प्रक्रियेसंदर्भातील सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बाबींच्या आकलनानंतर विविध समस्या, आव्हाने समोर आली, जी स्टार्टअपच्या आधारे काही नवीन पद्धतीने सोडवली जाऊ शकतात. याच हेतूने मत्स्यव्यवसाय विभागाच्या मुख्य 4 समस्या विधानांसाठी नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्याकरिता आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात जगभरातील नवउद्योजक सहभागी होऊ शकतात. मोठ्या आकाराच्या फिशपॉन्डचे स्वयंचलितीकरण (Automation), मत्स्यपालन प्रणाली (आरएएस) आणि बायोफ्लॉक (बीएफ) तंत्रज्ञानाची पुनर्रचना, बोटी, हार्बर आणि जेट्टीसाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर, माशांच्या कचऱ्याचा प्रभावी उपयोग या प्रमुख 4 समस्या विधानांसाठी उपाय सुचविण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता https://www.msins.
कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, कौशल्य विकास आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह यांच्यासह नवउद्योजक, स्टार्टअप्सचे प्रतिनिधी, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय कामकाजात नाविन्यतेच्या वापरावर भर – नवाब मलिक
मंत्री श्री. मलिक म्हणाले की, प्रशासकीय कार्यपद्धतीत नाविन्यतेचा वापर करण्यावर राज्य शासन भर देत आहे. शासनाची कार्यपद्धती अधिक सक्षम, संवेदनशील आणि प्रतिक्रियाशील बनविण्याकरिता नवीन दृष्टीकोन, प्रक्रिया, प्रणाली, वितरण यंत्रणा आणि साधने यांचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. या संकल्पनेच्या आधारे कौशल्य विकास विभागाच्या नाविन्यता सोसायटीमार्फत “महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी अभिनव, नाविन्यपूर्ण उपाय सुचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्य शासनाच्या विविध विभागांकडून त्यांची समस्या विधाने एकत्रित करून जाहीर करण्यात येतात आणि नाविन्यपूर्ण संकल्पना, उपाययोजनांसाठी नवोदितांना आवाहन केले जाते. आज मत्यव्यवसाय विभागासाठी हा उपक्रम सुरु करण्यात येत असून याद्वारे या विभागाच्या कामकाजात नाविन्यपूर्ण संकल्पना रुजू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मासळी सुकविण्याच्या प्रक्रियेतही नवीन तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे. यामध्येही काही नवीन संकल्पना, स्टार्टअप्स पुढे येण्यासाठी विभागाने विचार करावा, असे मंत्री श्री. मलिक म्हणाले.
मत्स्यव्यवसाय अधिक परिणामकारक, गतिशील करण्यासाठी उपाययोजना – अस्लम शेख
मत्यव्यवसाय मंत्री श्री. शेख म्हणाले की, महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मत्स्य व्यवसायाचे योगदान खूपच महत्वपूर्ण आहे. राज्याची लोकसंख्या आणि फिश प्रोटीनची वाढती मागणी लक्षात घेता मत्स्यव्यवसाय अधिक परिणामकारक आणि अधिक गतिशील करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागातील समस्या जाणून घेणे आणि त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे या उद्देशाने महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज उपक्रमात विभाग सहभागी होत आहे. या उपक्रमातून पुढे येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करुन विभागाचे कामकाज अधिक प्रभावी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, कौशल्यविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी विभागामार्फत नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सर्वांच्या सहभागातून ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येईल, असा विश्वास सर्वांनी यावेळी व्यक्त केला.