मतांची लूट, लोकशाहीची फसवणूक; साकोलीत खळबळजनक आरोपांनी राजकीय वातावरण तापले
साकोली | विशेष प्रतिनिधी (पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क)
साकोली नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाने लोकशाही उत्सवाऐवजी संशय, संताप आणि आरोपांच्या धगेला जन्म दिला असून, “ही निवडणूक नाही तर लोकशाहीची निर्घृण हत्या आहे” असा गंभीर आरोप उमेदवार आणि नागरिकांकडून केला जात आहे. मतमोजणी प्रक्रियेत ईव्हीएमवर संशय व्यक्त करत अनेक प्रभागांतील उमेदवारांनी थेट आक्षेप नोंदविल्याने साकोलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
मतदान २ डिसेंबरला झाले, निकाल ३ डिसेंबरला अपेक्षित असताना अचानक २१ डिसेंबरला जाहीर करण्यात आल्याने पहिल्यापासूनच शंका निर्माण झाली. निकाल जाहीर होताच अनेक प्रभागांमध्ये मतांची आकडेवारी धक्कादायक असल्याचे निदर्शनास आले. काही उमेदवारांना केवळ १० ते २० मते मिळाल्याचे दाखविण्यात आले असून, प्रत्यक्षात संबंधित प्रभागांत त्यांचा प्रभाव अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे.
“मी स्वतः मतदान केंद्रात होतो, माझे कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते सर्वांनी मतदान केले. मग एवढीच मते कशी?” असा थेट सवाल उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत आहे. विशेषतः महिला आरक्षित प्रभागांतील निकालांबाबत संशय अधिक गडद झाला असून, काही ठिकाणी विजयी उमेदवारांनाही मिळालेल्या मतसंख्येबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात ईव्हीएममध्ये छेडछाड, मतांची अदलाबदल आणि निवडणूक यंत्रणेचा गैरवापर झाल्याचे आरोप होत आहेत. “हा निकाल जनतेचा नसून यंत्रणेचा आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक, कार्यकर्ते आणि पराभूत उमेदवार व्यक्त करत आहेत.
साकोली शहरात या निकालाविरोधात जोरदार चर्चा सुरू असून, पुनर्मोजणी, बॅलेट पेपरवर फेरनिवडणूक आणि स्वतंत्र चौकशीची मागणी पुढे येत आहे. जर तातडीने चौकशी झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही उमेदवारांनी दिला आहे.
लोकशाहीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाकडे निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. साकोलीत पेटलेली ही आग केवळ एका नगरपरिषदपुरती मर्यादित न राहता लोकशाहीच्या मुळांनाच हादरा देणारी ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
