मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांची बडनेरा मतदार संघातील मतदान केंद्रांना भेट
अमरावती, दि. 29 : मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी व्दितीय भेट कार्यक्रमांतर्गत बुधवारी (ता. 28 ऑगस्ट) बडनेरा मतदार संघातील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदार नोंदणी व केंद्रांवर असलेल्या सुविधांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीचे संचालक तथा नोडल अधिकारी अजय लहाने, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय जाधव, नायब तहसीलदार मधुकर धुळे, विलास वाढोणकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्तांनी बडनेरा मतदार संघांतर्गत येणाऱ्या वडाळी, यशोदानगर, संजय गांधी नगर परिसरातील लोटस (करण) इंग्लीश प्रि प्रायमरी स्कुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील मतदान केंद्राची पाहणी केली.
भारत निवडणूक आयोगाव्दारे विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मतदार यादी निरीक्षकांना 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विभागातील सर्व जिल्ह्यांना विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तीन भेटी करावयाच्या असून, त्यानुसार प्रथम भेट व आढावा बैठका यापूर्वी घेण्यात आल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांकरीता दि. 28 ऑगस्ट व दि. 29 ऑगस्ट रोजी व्दितीय व तृतीय भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला असून त्यानुसार आज विभागीय आयुक्तांनी मतदानकेंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मतदार नोंदणी, मतदार याद्या, बडनेरा मतदारसंघातील एकुण पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग, जेष्ठ मतदारांची संख्या याबाबत संबंधितांकडून माहिती घेतली.
दरम्यान, कोणताही पात्र मतदार मतदान यादीत नाव नोंदवावयाचा शिल्लक राहू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. भारत निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या सुधारित कार्यक्रमानुसार 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सुधारित कार्यक्रमानुसार 6 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या असून पात्र नागरिकांची नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणी आदी कामे पूर्ण झाली आहेत. प्राप्त दावे व हरकतींचे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत निराकरण करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी, दुरूस्ती व वगळणी यासाठी दि.17 व 18 ऑगस्ट 2024 या दिवशी विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविला गेला असून या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार यादीसह उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर अनुषंगीक कामे पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिली.
निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुद्धीकरण महत्त्वपूर्ण असते. त्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. मतदार यादीत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही व एकही पात्र मतदार येत्या निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.
00000