मंत्रालयात २३ ते २६ सप्टेंबर कालावधीत नवतेजस्विनी प्रदर्शनाचे आयोजन
Summary
मुंबई, दि. २०: ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी ग्राहकवर्गाशी थेट जोडणे, विक्रीला चालना देणे आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळकटी देणे यासाठी त्यांच्या उत्पादनांच्या नवतेजस्विनी प्रदर्शनाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दि. २३ […]
मुंबई, दि. २०: ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी ग्राहकवर्गाशी थेट जोडणे, विक्रीला चालना देणे आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळकटी देणे यासाठी त्यांच्या उत्पादनांच्या नवतेजस्विनी प्रदर्शनाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दि. २३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत असणार आहे, अशी माहिती माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका राजलक्ष्मी शाह यांनी दिली आहे.
हे प्रदर्शन महिला व बालविकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मार्फत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर आणि सचिव डॉ. अनुप कुमार यादव हे भेट देऊन ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देतील.
या प्रदर्शनात एकूण १२ स्टॉल्स उभारले जाणार असून, त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आकर्षक बांबूच्या वस्तू, गोंदियाच्या लाखेच्या बांगड्या, वारली कलेच्या वस्तू, चित्रे, पौष्टिक व चविष्ट मिलेटयुक्त पदार्थ यांसारखी उत्पादने असणार आहेत.
000
