BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भोसा–टाकळी परिसरात शेळ्याचोरीचा धुमाकूळ; अज्ञात चोरट्यांनी ११ शेळ्या लंपास, ₹६१ हजारांचा मुद्देमाल चोरीला

Summary

वरठी | प्रतिनिधी वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसा–टाकळी परिसरात शेळ्याचोरीची घटना उघडकीस आल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री संधी साधत तब्बल ११ शेळ्या चोरून नेल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

वरठी | प्रतिनिधी
वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसा–टाकळी परिसरात शेळ्याचोरीची घटना उघडकीस आल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री संधी साधत तब्बल ११ शेळ्या चोरून नेल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी विशाल जयगोपाल गजभिये (वय ३२, रा. भोसा–टाकळी, ता. मोहाडी) यांनी त्यांच्या मालकीच्या लहान-मोठ्या एकूण ७ शेळ्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बांधून ठेवल्या होत्या. दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २.०० ते २.३० वाजताच्या दरम्यान, फिर्यादी घरी झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधून त्यातील ४ शेळ्या चोरून नेल्या.
यानंतर शेळ्यांचा शोध घेत असताना परिसरातील इतर पशुपालकांकडून माहिती मिळाली की,
गणेश शामू कारेमोरे (रा. नेरी) यांच्या ३ शेळ्या (प्रत्येकी ₹५,००० प्रमाणे ₹१५,०००),
मोरेश्वर माधव माकडे (रा. पाचगाव) यांची १ शेळी (₹६,०००),
संतोष डेबीलाल राहांगडाले (रा. पाचगाव) यांच्या २ शेळ्या (प्रत्येकी ₹५,००० प्रमाणे ₹१०,०००),
तसेच प्रभूदास दागो गजबे (रा. पाचगाव टोली) यांची १ शेळी (₹६,०००)
अशा प्रकारे एकूण ११ शेळ्या, ज्यांची अंदाजे किंमत ₹६१,००० इतकी आहे, त्या चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा क्रमांक २०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शेंडे (ब.नं. ३०९) हे करीत असून, परिसरात वाढत्या शेळ्याचोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक व पशुपालकांकडून होत आहे.

संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *