भुकेल्याची भूक भागविण्याचे महत्त्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र – कृषिमंत्री दादाजी भुसे
Summary
मालेगाव, दि. 18 (उमाका वृत्तसेवा) : अल्प दरासह संकट काळात मोफत उपलब्ध होत असलेल्या शिवभोजनामुळे भुकेल्यांची भूक भागविण्याचे महत्त्वपूर्ण काम होत आहे. हा एक सेवाभावी उपक्रम असून सामान्य रुग्णालय परिसरात सुरू झालेल्या या शिवभोजन केंद्रामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना सकस आहारासोबत मायेचा आधार मिळेल […]

मालेगाव, दि. 18 (उमाका वृत्तसेवा) : अल्प दरासह संकट काळात मोफत उपलब्ध होत असलेल्या शिवभोजनामुळे भुकेल्यांची भूक भागविण्याचे महत्त्वपूर्ण काम होत आहे. हा एक सेवाभावी उपक्रम असून सामान्य रुग्णालय परिसरात सुरू झालेल्या या शिवभोजन केंद्रामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना सकस आहारासोबत मायेचा आधार मिळेल असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले महिला बचतगटामार्फत येथील सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ॲड.रविंद्र पगार, बाजार समितीचे उपसभापती सुनिल देवरे, रामा मिस्तरी, संदीप पवार, विजय पवार, धनंजय पाटील, सलीम रिझवी, पुरवठा निरीक्षक सचिन शिंदे, बचतगटाच्या अध्यक्षा गिताबाई तायडे, हेमलता मानकर, संगीता पवार, मयुर वांद्रे, मोसीन शेख, किशोर इंगळे आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुलेंच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन केंद्राचे पावित्र्य राखले जाईल असा विश्वास देतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, एकही नागरिक उपाशी राहणार नाही, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण स्मरणात ठेवून शिवभोजनाच्या माध्यमातून एक चांगला सेवाभावी उपक्रम राबविला जात आहे. शहरातील हे चौथे शिवभोजन केंद्र असून प्रत्येक केंद्रावर गरजूंना सकस आहाराबरोबर दिलासा देण्याचे उत्तम काम या माध्यमातून साकारताना दिसत आहे. आहाराची गुणवत्ता राखण्याबरोबर एकही गरजू यापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व केंद्रप्रमुखांनी दक्ष राहण्याच्या सूचनाही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.
मातीशी नाळ जोडलेला कृषिमंत्री : ॲड.पगार
तळागाळातील शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी अहोरात्र झटणारा, मातीशी नाळ जोडलेला कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून राज्याला मिळाला आहे. ही आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगतांना ॲड.रविंद्र पगार म्हणाले, गोरगरिब जनतेला केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या पोटाची खळगी भरण्याचे उत्तम कार्य शिवभोजनाच्या माध्यमातून होत आहे. कोरोनाच्या महामारीतील विदारक चित्र एकाबाजूला उभे असतांना दुसऱ्या बाजूला शासनाच्या माध्यमातून मोफत अन्नधान्यासह शिवभोजन हे दिलासा देण्याचे काम करित असल्याचेही ॲड.पगार यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी सामान्य रुग्णालयात दाखल रुग्णांची माहिती मंत्री श्री.भुसे यांनी जाणून घेतली. तसेच डॉ.धिरेंद्र चव्हाण व डॉ.सजिंवनी चव्हाण या कोरोनायोध्दांचा सन्मानही मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते करण्यात आला.