BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई विज्ञानं-तंत्रज्ञान हेडलाइन

‘भाषिणी’ च्या माध्यमातून आता विविध भाषातील संवाद सुलभ होणार – अमिताभ नाग

Summary

मुंबई, दि. ६ :-  आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित ‘भाषिणी’ हा संवादाचा नवीन सेतू ठरत आहे. ‘भाषिणी’ च्या माध्यमातून संवादासाठी भाषा-भाषांमधील अंतर कमी होऊन नागरिकांचा अन्य भाषेतील संवाद अधिक सुलभ होईल, असे प्रतिपादन डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ […]

मुंबई, दि. ६ :-  आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित ‘भाषिणी’ हा संवादाचा नवीन सेतू ठरत आहे. ‘भाषिणी’ च्या माध्यमातून संवादासाठी भाषा-भाषांमधील अंतर कमी होऊन नागरिकांचा अन्य भाषेतील संवाद अधिक सुलभ होईल, असे प्रतिपादन डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांनी ‘भाषिणी- भाषेचा अडसर दूर करणे’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

‘भाषा इंटरफेस फॉर इंडिया’ या संकल्पनेवर आधारित ‘भाषिणी’ प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याचे सांगून श्री. नाग म्हणाले, ‘एआय’ आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून एक सर्वंकष संवाद व्यवस्था उभी केली जात आहे. ‘भाषिणी’ च्या माध्यमातून नागरिक संवादासाठी केवळ मजकूर नव्हे तर थेट आवाजातून आवाजात भाषांतर करू शकतील असेही त्यांनी सांगितले.

‘भाषिणी’ मध्ये ऑडिओ-टू-टेक्स्ट, टेक्स्ट-टू-ऑडिओ, टेक्स्ट ट्रान्सलेशन अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. केवळ मजकुराचे नाही तर आवाजावरून थेट आवाजात भाषांतरही शक्य झाले असल्याने एक व्यक्ती एका भाषेत बोलल्यास, समोरची व्यक्ती तो संवाद दुसऱ्या भाषेत सहज समजू शकतो, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नाग यांनी सांगितले.

शासकीय योजनांची माहिती, हेल्पलाईन सेवा, शिक्षणविषयक साहित्य हे सर्व भाषिणीच्या मदतीने प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार असल्याने योजनांचा लाभ मिळण्यास निश्चित उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *