‘भरोसा सेल’ची सेवा प्रत्येक तालुकास्तरावर देण्यासाठी प्रयत्न करावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लातूर जिल्ह्यातील मुलींचे वाढते प्रमाण सुचिन्ह
Summary
लातूर, दि. 17 (जिमाका) : महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून होणारे समुपदेशन महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व तालुका स्तरावरही भरोसा सेलची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित […]
लातूर, दि. 17 (जिमाका) : महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून होणारे समुपदेशन महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व तालुका स्तरावरही भरोसा सेलची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित लातूर व धाराशिव जिल्ह्याच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, धाराशिवचे अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, लातूर शहर महानगपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह लातूर व धाराशिव जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये समुपदेशन ही महत्वाची गोष्ट असून त्यातून तुटणारे संसार वाचविण्याचे काम भरोसा सेल करत आहे. लातूर, धाराशिव जिल्ह्यात या सेलद्वारे होणारे समुपदेशन व मार्गदर्शनाची सुविधा तालुकास्तरावरील पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अथवा इतर पर्याय शोधून भरोसा सेलची सेवा प्रत्येक तालुकास्तरावरील पोलीस स्टेशनमध्ये उपब्लध करण्यासाठी प्रयत्न करावेत. संबंधित पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस अधिकाऱ्यावर याबाबतची जबाबदारी सोपवावी, अशा सूचना उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. तसेच भरोसा सेलच्या माध्यमातून पुन्हा एकत्र राहत असलेल्या जोडप्यांचा संसार सुरळीत सुरु असल्याची, संबंधित महिलेला कोणताही त्रास नसल्याबाबतची खात्री ठराविक कालावधीनंतर केली जावी, असेही त्यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील मुलींची वाढती संख्या ही सुचिन्ह
लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून मुलींचा जन्मदर वाढत असून सध्या लातूर जिल्ह्यात हे प्रमाण 948 इतके आहे. मुलींचा वाढता जन्मदर हे सुचिन्ह असून जिल्ह्यात कुठेही गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या होवू नये, यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करून संशयास्पद प्रकरणांची तातडीने चौकशी करावी, अशा सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. लातूर व धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत माता-बालक यांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. महिलांमधील कॅन्सर व इतर दुर्धर आजारांच्या तपासणीसाठी व उपचारासाठी विशेष प्रयत्न करावेत. विविध खासगी उद्योगांच्या सीएसआर निधीतूनही मदत उपलब्ध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थलांतरीत मजूर व त्यांच्या पाल्यांना सुविधा पुरविण्यासाठी मोहीम हाती घ्यावी
लातूर, धाराशिव जिल्ह्यातून ऊसतोडणी आणि इतर कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांना शासनाच्या निकषानुसार आरोग्य सुविधा, शिधापत्रिकेवरील अन्नधान्य वितरण करण्यासह त्यांच्या पालकांना शिक्षण विषयक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषद, समाज कल्याण, पुरवठा विभाग यांनी मोहीम राबवून असा मजूर, कामगारांना विविध सुविधांचा लाभ द्यावा. यासाठी समाजकार्य विद्यालयांची मदत घ्यावी, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत देण्यात आलेल्या लाभाची माहिती त्यांनी यावेळी घेतली.
समाज कल्याण विभागांतर्गत शाळांमधील शिक्षकांची क्षमता बांधणी करावी
समाज कल्याण विभागांतर्गत शाळांमधील मुलांना, तसेच दिव्यांग मुलांसाठी असलेल्या शाळांमध्ये आधुनिक अभ्यासक्रमाचे शिक्षण उपलब्ध होण्यासाठी या शाळांमधील शिक्षकांच्या क्षमता बांधणीवर भर द्यावा. तसेच या शिक्षकांच्या शिक्षणाबाबत काही नवीन संकल्पना असल्यास त्या समजून घेवून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे व सहकार्य करण्याच्या सूचनाही श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.
लातूर पोलिसांच्या ‘साभार परत’ उपक्रमाचे कौतुक
समाज माध्यमांवर अवैध शस्त्रासह फोटो अथवा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या मुलांना पोलीस स्टेशनमध्ये आणून समज देणे, तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यासाठी लातूर पोलीस दलामार्फत ‘साभार परत’ उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बैठकीत दिली. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून त्यातून वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
लातूर व धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची सद्यस्थिती, रिक्त पदे, सामाजिक न्याय विभाग, महिलाविषयक गुन्हे आदी बाबींचा उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी आढावा घेतला.