भंडारा पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’! ११ पोलीस ठाण्यांचा एकाच वेळी प्रहार; ७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या आदेशाने दारू माफ्यांचे कंबरडे मोडले; गावठी दारूचे ‘भट्टी’ अन् ‘सडवा’ उद्ध्वस्त!
भंडारा:
जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भंडारा पोलिसांनी आता कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या थेट आदेशावरून जिल्ह्यातील तब्बल ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला. या महामोहिमेत ७ लाख ३५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दारू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
खाकीची ‘दहा’ दिशांनी धडक कारवाई!
जिल्ह्यातील जवाहरनगर, भंडारा, कारधा, तुमसर, आंधळगाव, सिहोरा, गोबरवाही, साकोली, पवनी, अडयाळ आणि दिघोरी या भागांतील दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला. जिथे गावठी दारू गाळली जात होती, त्या भट्ट्या पोलिसांनी जागेवरच उद्ध्वस्त केल्या.
प्रमुख कारवायांचा धावता आढावा:
जवाहरनगर पोलिसांचा मोठा दणका: शहापूर परिसरात महादेव बिसन बागडे याच्या अड्ड्यावर धाड टाकून १ लाख ४६ हजार १०० रुपयांचा सडवा मोहपास आणि दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले.
साकोलीत लाखांचा मुद्देमाल: अनमोल भीमराव बोरकर याच्या अड्ड्यावर धाड टाकून १ लाख ३१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात १७५० किलो सडवा मोहाफुल जप्त करण्यात आले.
अड्याळ पोलिसांची कामगिरी: निखिल तारांच कावरे याच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचा सडवा मोहफास जप्त करण्यात आला.
तुमसर व गोबरवाही परिसरात खळबळ: तुमसरमध्ये ३ वेगवेगळ्या कारवायांत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर गोबरवाहीत चक्क जमिनीत खड्डे खोदून लपवलेला ४० हजार रुपयांचा मोहफास शोधून काढला.
महिला आरोपींवरही कारवाई: भंडारा शहर, कारधा, आंधळगाव आणि तुमसर भागात अवैध दारू विक्री करणाऱ्या महिला आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
नदीपात्र अन् निर्जन स्थळी ‘कोम्बिंग ऑपरेशन’
अनेक ठिकाणी तस्करांनी नदीकाठी किंवा निर्जन ठिकाणी मोहफुलाचा सडवा लपवून ठेवला होता. मात्र, पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने या जागा शोधून काढल्या. जळाऊ लाकडे, जर्मनचे कटोरे, प्लास्टिक पाईप आणि मातीच्या चुली असा दारू गाळण्याचा संपूर्ण ‘सेटअप’ पोलिसांनी जप्त केला आहे.
कडक कारवाईचा इशारा!
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व ठाणेदार आणि पोलीस अंमलदारांनी पार पाडली. जिल्ह्यात एकही अवैध धंदा चालू देणार नाही, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
वृत्त संकलन: अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com
📞 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: ७७७४९८०४९१
