बॉम्ब स्फोट च्या बातमीने पुणे शहर धास्तावले
बॉम्ब स्फोट च्या बातमीने पुणे शहर धास्तावले
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याची बातमी काल सकाळच्या सुमारास समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यामुळे संपूर्ण रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे रेल्वे वाहतूकही कोलमडली होती.
रेल्वे प्रशासन, लोहमार्ग आणि शहर पोलीस तसेच बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक या यंत्रणांची तर चांगलीच धांदल उडाली होती. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सापडलेली वस्तू बॉम्ब नसून फटाक्याच्या पुंगळ्या असल्याचे स्पष्ट झाले अन् वातावरण तणावमुक्त झाले.
सकाळच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर साफसफाई करणाऱ्या महिलेला फलाट क्रमांक एकच्या बाहेर बॉम्ब सदृश वस्तू दिसली होती. त्यांनी लोहमार्ग पोलिसांना ही माहिती दिली. ही माहिती शहर पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर या यंत्रणांची धावाधाव सुरू झाली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहआयुक्त संदीप कर्णीक यांनी घटनास्थळी हजेरी लावली. वस्तू आढळलेला परिसर रिकामा करण्यात आला, तसेच स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. बॉम्बशोधक व नाशक पथकाने तसेच श्वान पथकाने वस्तूची तपासणी केली असता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ नसल्याचे तसेच त्या जिलेटीनच्या कांड्या नसल्याचे स्पष्ट झाले.
संबंधित वस्तूची तपासणी करण्यासाठी तसेच ते स्फोटक सदृश्य पदार्थ असल्याचे आढळून आल्यास ते निकामी करण्यासाठी बी. जे. मेडिकल कॉलेजच्या मैदानावर ही वस्तू नेण्यात आली. त्यानंतर ही बॉम्बसदृश्य वस्तू नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दुपारी बारानंतर स्थानकावरील व्यवहार सुरळीत झाले. या घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. रेल्वे स्टेशनवरील रेल्वे वाहतूक सुरळीत चालू झाली.
पत्रकार – सागर घोडके
पुणे (मावळ)