बुलढाणा जिल्ह्यातील लोकहिताची विविध कामे तातडीने मार्गी लावावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंचन, औद्योगिक, रस्ते, पर्यटनांच्या कामांना गती देण्याचे निर्देश
Summary
मुंबई, दि. २४ :- बुलढाणा जिल्ह्यातील सिंचन, रस्ते आदी लोकहिताची विविध कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मोताळा औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी आणि त्याअंतर्गत कामाला गती देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्री श्री. शिंदे […]

मुंबई, दि. २४ :- बुलढाणा जिल्ह्यातील सिंचन, रस्ते आदी लोकहिताची विविध कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मोताळा औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी आणि त्याअंतर्गत कामाला गती देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बुलडाणा जिल्हा तसेच बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस सहकार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे -पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, लोकांना दिलासा देणारी छोटे-छोटे प्रकल्प, कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. छोट्या प्रकल्पामुळे सिंचन क्षमता निर्माण होते, त्यातून शेतकऱ्यांना फायदा होतो. अशा कामांना प्राधान्य देण्यात यावे. पर्यटन हे मोठे क्षमता असलेले क्षेत्र आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांना आणि सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बैठकीत हरमोड सिंचन तलावाची उंची वाढविणे, पलढग धरणाचे वाहून जाणारे पाणी नळगंगा धरणात वळविणे, गिरडा साठवण तलावाची क्षमता वाढविणे, किन्होळा शिवारामध्ये साठवण धरण, बुलढाणा नगरपरिषदेला सामाजिक सभागृह तसेच उद्यान व चौपाटीसाठी जागा हस्तांतरण येळगांव पर्यटन प्रकल्प, बुलढाणा -चिखली- मलकापूर रस्त्याचे काम, बुलढाणा जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा फूडपार्क उभारणे अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
0000