क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

बावनथडी नदीपात्रात मोठी कारवाई; विनापरवाना रेती उत्खननावर पोलिसांचा घाला, ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Summary

तुमसर (भंडारा): अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात भंडारा जिल्हा पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत रेतीमाफियांना जबर धक्का दिला आहे. तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावनथडी नदीपात्रात सुरू असलेल्या विनापरवाना रेती उत्खननावर धाड टाकत पोलिसांनी दोन ट्रॅक्टर, रेतीने भरलेल्या ट्रॉली आणि […]

तुमसर (भंडारा):
अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात भंडारा जिल्हा पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत रेतीमाफियांना जबर धक्का दिला आहे. तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावनथडी नदीपात्रात सुरू असलेल्या विनापरवाना रेती उत्खननावर धाड टाकत पोलिसांनी दोन ट्रॅक्टर, रेतीने भरलेल्या ट्रॉली आणि एक लोडर असा तब्बल ४६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.२० ते ८.०० वाजेदरम्यान, पो.हवा. गणेश भदुजी बांते (ब.नं. ११७५), पोलीस ठाणे गोबरवाही, हे तुमसर परिसरात स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना कवलेवाडा गावाजवळील बावनथडी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.
छाप्यादरम्यान नदीपात्रात महिंद्रा युवो (लाल रंग) व स्वराज कंपनीचा (निळा रंग, विना नंबर) असे दोन ट्रॅक्टर-ट्रॉली रेती भरताना आढळून आले. त्याचवेळी एक जॉन डिअर कंपनीचा हिरव्या रंगाचा लोडर घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
चौकशीत ट्रॅक्टर चालकांनी रेती वाहतुकीस कोणताही वैध परवाना नसल्याचे कबूल केले. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये
सुनिल ताराचंद पुराम (रा. धुटेरा, ता. तुमसर, जि. भंडारा)
लक्की देवदास पाचे (रा. हरदोली, ता. तिरोडी, जि. बालाघाट, म.प्र.)
यांचा समावेश आहे. तसेच लोडरचा चालक/मालक मनीष ठाकरे (रा. मोहगांव, जि. बालाघाट, म.प्र.) हा पसार असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या मते, दोन्ही ट्रॅक्टर प्रत्येकी सुमारे ८ लाख रुपये किमतीचे असून त्यामध्ये २ ब्रास रेती (१२ हजार रुपये) होती. पसार झालेल्या लोडरची किंमत अंदाजे ३० लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ४६,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अप. क्र. २२/२०२६ अंतर्गत भा.न्या.संहिता-२०२३ चे कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हवा. मंगेश पेंदाम (ब.नं. ११२१) हे करीत आहेत.
भंडारा जिल्ह्यात अवैध रेती उत्खननावर पोलिसांचा वाढता दबाव स्पष्ट दिसून येत असून, अशा कारवायांमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *