BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

बालगृहातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Summary

मुंबई, दि. १४ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालगृहात घडलेल्या अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांमध्ये अतिदक्षता बाळगून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विशेष यंत्रणा राबविण्याच्या दृष्टीने शासन कार्यरत असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानभवन येथे झालेल्या […]

मुंबई, दि. १४ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालगृहात घडलेल्या अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांमध्ये अतिदक्षता बाळगून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विशेष यंत्रणा राबविण्याच्या दृष्टीने शासन कार्यरत असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानभवन येथे झालेल्या बैठकीत दिली.

या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, प्रज्ञा सातव, आयुक्त नयना गुंडे, सहायुक्त राहुल मोरे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रभावी धोरण तयार करणे आवश्यक आहे. मुलींचा शैक्षणिक दर्जा, कौशल्यविकास आणि जीवनमूल्ये वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. बालगृहास प्रत्यक्ष भेटी देऊन तसेच लोकप्रतिनिधी आणि विभागामध्ये चर्चा करून यासंदर्भात कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. बालगृहातील मुलींच्या समस्या समजून घेण्यासाठी व उपाययोजना करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. राज्यातील सर्व बालगृहे नोंदणीकृत आहेत का, हे पाहण्यासाठी गुगल मॅपिंगद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. आदिवासी विकास, सामाजिक विकास आणि महिला व बालविकास या विभागांतील बालगृहांची यादी एकत्रित केली जात आहे.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संकटात किंवा अन्य अडचणीत असलेल्या महिलांना सहाय्य व आधार देण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत महिला सहाय्यता केंद्र, स्वाधारगृह योजना, उज्ज्वला योजना, सखी वन स्टॉप सेंटर योजना, बाल सुरक्षा योजना, किशोरी शक्ती योजना, पालकत्व योजना अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक 181 कार्यरत आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *