‘बार्टी’मार्फत आयोजित यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत
Summary
मुंबई, दि. १७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) राबविण्यात येणार आहे. त्याकरिता १४ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात […]
मुंबई, दि. १७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) राबविण्यात येणार आहे. त्याकरिता १४ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
२७ ऑगस्ट २०२३ रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) आयोजित करण्यात आली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://www.siac.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे.
राज्यातील अनुसूचित जातीतील ३०० उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेच्या ( पूर्व व मुख्य) पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी पुरस्कृत (Sponsor) करण्यात येणार आहे.
यूपीएससी परीक्षेच्या पूर्व तयारी प्रशिक्षणासाठी दिल्लीतील केंद्रासाठी अनुसूचित जातीच्या ३०० उमेदवारांची निवड करण्यात येईल. त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी, ४ टक्के जागा दिव्यांग व्यक्तीसाठी (Person With Disability), ५ टक्के जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जातीमधील (वाल्मिकी व तत्सम जाती- होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी इ.) विद्यार्थ्यांकरिता आरक्षित असतील, एकूण जागांच्या ५% जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येतील.
उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा,उमेदवाराचे वय संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेच्या अटी व शर्ती नुसार असावे,
संघ लोकसेवा आयोगामार्फत सन २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी पात्र असावा, रुपये ८ लाखापर्यंत कौटुंबिक उत्पन्न मर्यादा असलेले उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतील.
बार्टी संस्थेमार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षण शुल्क देण्यात येते, हे प्रशिक्षण अनिवासी असल्याने उमेदवारांना दिल्ली येथील निवास व भोजनाची व्यवस्थेकरिता प्रती माह कमाल रक्कम १३ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. विद्यावेतन करिता विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात येईल, प्रशिक्षणाच्या सुरवातीस दिल्ली येथे जाण्याकरिता पाच हजार रुपये (एकदा) व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासाकरिता पाच हजार रुपये (एकदा) प्रवास खर्च देण्यात येतो, पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य तीन हजार रुपये (एकरकमी) देण्यात येते, अशी माहिती महासंचालक श्री. वारे यांनी दिली.
००००