बारव्हा गावात खळबळ – नाबालिग विद्यार्थिनीशी प्राध्यापकाकडून छेडछाड, कारवाईचा अभाव चिंताजनक
Summary
लाखांदूर :- बारव्हा गाव परिसरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने 12 वीमध्ये शिकणाऱ्या नाबालिग विद्यार्थिनीशी छेडछाड केल्याची चर्चा रंगली असून, या घटनेबाबत बाल कल्याण समितीपर्यंत तक्रार पोहोचली असली तरी अद्याप पोलिसांनी […]
लाखांदूर :- बारव्हा गाव परिसरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने 12 वीमध्ये शिकणाऱ्या नाबालिग विद्यार्थिनीशी छेडछाड केल्याची चर्चा रंगली असून, या घटनेबाबत बाल कल्याण समितीपर्यंत तक्रार पोहोचली असली तरी अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी सहसा आपल्या नातेवाईकांसोबतच महाविद्यालयात ये-जा करत होती. मात्र, सहा दिवसांपूर्वी दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर ती आपल्या नातेवाईकांची वाट पाहत एकटी उभी असताना संबंधित प्राध्यापकाने तिच्याशी छेडछाड केली. त्यानंतर ती नातेवाईकांसोबत घरी गेली आणि संतापाच्या भरात चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून बाल कल्याण समितीला तक्रार नोंदवली.
बाल कल्याण समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती स्थानिक दिघोरी/मोठी पोलीस ठाण्याला दिल्याची चर्चा असली तरी, अद्याप अधिकृत गुन्हा दाखल न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात असंतोष पसरला असून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात दिघोरी मोठी पोलीस ठाण्याचे थानेदार प्रमोद शिंदे यांनी स्पष्ट केले की,
“पीडित विद्यार्थिनीने चाईल्ड हेल्पलाईनवर तक्रार केली आहे. सध्या अधिकारी तपास करीत आहेत. मात्र, पीडित विद्यार्थीनी अथवा तिचे पालक थेट पोलिस ठाण्यात येऊन लिखित तक्रार दाखल करतील, किंवा चाईल्ड हेल्पलाईनकडून अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.”
स्थानिक नागरिकांचा ठाम प्रश्न असा आहे की, जेव्हा नाबालिग मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तेव्हा पोलिसांनी त्वरित दखल घेऊन आरोपी प्राध्यापकाविरुद्ध कारवाई का केली जात नाही? यावरून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्वरीत हस्तक्षेप करून सखोल चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
—
संकलन
गणेश सोनपिंपळे
भंडारा, गोंदिया न्यूज रिपोर्टर
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
8605966703
