बाबा बागेश्वरांचे पाय धरल्याने टीआय मनीष तिवारी लाईन अटॅच
Summary
रायपूर | प्रतिनिधी बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बाबा बागेश्वर यांच्या स्वागतावेळी गणवेशात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांचे पाय धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागाने तात्काळ कारवाई केली आहे. या प्रकरणात संबंधित पोलीस निरीक्षक (टीआय) […]
रायपूर | प्रतिनिधी
बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बाबा बागेश्वर यांच्या स्वागतावेळी गणवेशात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांचे पाय धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागाने तात्काळ कारवाई केली आहे. या प्रकरणात संबंधित पोलीस निरीक्षक (टीआय) मनीष तिवारी यांना शिस्तभंगाच्या आरोपाखाली लाईन अटॅच करण्यात आले आहे.
ही घटना रायपूर विमानतळावर घडली. बाबा बागेश्वर हे सरकारी विमानाने रायपूर येथे दाखल झाले होते. त्यांच्या स्वागतावेळी टीआय मनीष तिवारी यांनी गणवेशातच बूट काढून खाली वाकत बाबा बागेश्वरांना प्रणाम करत पाय धरले. या घटनेचा व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस दलाच्या शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. शासकीय सेवेत असताना, विशेषतः गणवेशात, अशा प्रकारचे कृत्य अनुशासनभंग ठरते, असे मत वरिष्ठ स्तरावरून व्यक्त करण्यात आले. याची दखल घेत पोलीस प्रशासनाने तातडीने टीआय मनीष तिवारी यांना लाईन अटॅच करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या घटनेमुळे आणखी एक वाद निर्माण झाला असून, बाबा बागेश्वरांना सरकारी विमान का देण्यात आले? असा प्रश्नही सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू असून, पुढील कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर ठरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
