बहुतांश जिल्ह्यांत लम्पीबाधित जनावरांच्या संख्येत घट – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
Summary
मुंबई, दि. 19 : राज्यात गेल्या 3 -4 दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत लम्पी आजाराच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. श्री. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये लम्पी आजाराचा राज्यातील सद्यस्थितीबाबत विस्तृत […]
मुंबई, दि. 19 : राज्यात गेल्या 3 -4 दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत लम्पी आजाराच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
श्री. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये लम्पी आजाराचा राज्यातील सद्यस्थितीबाबत विस्तृत आढावा घेण्यात आला.
श्री. सिंह म्हणाले की, गत आठवडाभरातील पाऊस व त्यामुळे निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे कीटकांची वाढ, लम्पीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल ठरत होती. पावसाळी वातावरण व खालावलेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे दैनंदिन बाधित जनावरांची संख्या व मृत्यूमध्ये वाढ झाली होती. अनेक गावांमध्ये पशुपालकांनी गाभण गायींच्या लसीकरणास केलेला विरोध तसेच 4 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांना लसीकरण करणे निर्देशीत नसल्यामुळे वासरांमध्ये रोगप्रादुर्भाव अधिक होता. विभागाकडून सुरू असलेल्या औषधोपचारामुळे गेल्या 3-4 दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांमध्ये रोजच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने दि. 7 ऑक्टोबर, 2022 रोजी कीटक नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यभरात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवाव्यात. पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 17 ऑक्टोबर, 2022 रोजी दिलेल्या सुधारीत उपचार शिफारशींनुसार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन जनावरांना औषधोपचार व लसीकरण करावे, शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना जनावरांवरील उपचारासाठी सहकार्य करावे, असेही श्री. सिंह यांनी सांगितले.
राज्यात दि. 19 ऑक्टोबर, 2022 पर्यंत 7 हजार 394 जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी आवश्यक खबरदारी घ्यावी. लम्पीचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळीच सुरू झाल्यास बहुतांश जनावरे उपचाराला चांगला प्रतिसाद देतात. सर्व पशुपालकांनी लम्पीच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
राज्यामध्ये दि. 19 ऑक्टोबर, 2022 अखेर 32 जिल्ह्यांमधील एकूण 2 हजार 820 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 1 लाख 18 हजार 313 बाधित पशुधनापैकी एकूण 75 हजार 118 पशुधन उपचाराद्वारे रोगमुक्त झाले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 140.97 लाख लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण 133.12 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे 95.14% गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.