फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यांगांना आवाहन

मुंबई, दि. २८ : दिव्यांग व्यक्तीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई व्हेइकल) महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ६ फेब्रुवारी २०२५ पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तीना पुरेशा सोयी उपलब्ध करुन देवून रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना कुटुंबासोबत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तीनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी, अर्ज करण्यासाठी पोर्टल २२ जानेवारी २०२५ रोजी पासून सुरू करण्यात आले आहे. या योजनेत लाभ घेण्यासाठी https://register.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. या योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन दिव्यांग व वित्त विकास महामंडळाने केले आहे.
000