प्रबोधनाच्या मंचावरून वादग्रस्त उद्गार; सोशल मीडियावर रिल व्हायरल मुख्यमंत्री पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप — जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल
Summary
जवाहरनगर | प्रतिनिधी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमाला वादाचे गालबोट लागले असून, कार्यक्रमादरम्यान केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १४ जानेवारी २०२६ […]
जवाहरनगर | प्रतिनिधी
मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमाला वादाचे गालबोट लागले असून, कार्यक्रमादरम्यान केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता अशोकनगर–फुलमोगरा परिसरात प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नागपूर येथील अंजली भारती या गायिकेने सादरीकरण केले. कार्यक्रम सुरू असतानाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीविषयी कथित बदनामीकारक व आक्षेपार्ह शब्द उच्चारल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जनमानसात त्यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आणि महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरल्याचा दावा तक्रारीत नमूद आहे.
या कथित वक्तव्याचा रिल तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजक/सहभागी म्हणून संदेश ज्ञानेश्वर वासनिक (रा. अशोकनगर–फुलमोगरा) व इतरांचा सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी सौ. माहेश्वरी हेमराज नेवारे (वय ४६, रा. प्रगती कॉलनी, नहर रोड) यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे अप.क्र. 27/2026 नोंदविण्यात आला आहे. गुन्हा भा.न्या.सं. कलम 79, 356(2), 223 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 अन्वये दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील करीत असून, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित रिलची सत्यता, कार्यक्रमातील नेमकी घटना आणि संबंधितांची भूमिका याबाबत तपास सुरू आहे.
टीप: वरील सर्व बाबी तक्रारीवर आधारित असून, तपासाअंती सत्यता स्पष्ट होणार आहे.
