प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट येथे राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा
Summary
प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट येथे राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा गडचिरोली – दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था,गडचिरोली द्वारा संचालित प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट येथे संस्थाध्यक्ष डॉ. राजाभाऊ मुनघाटे व शाळा समन्वयक डॉ. सुरेश लडके यांच्या मार्गदर्शनाखाली थोर गणितज्ञ श्रीनिवास […]
प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट येथे राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा
गडचिरोली – दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था,गडचिरोली द्वारा संचालित प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट येथे संस्थाध्यक्ष डॉ. राजाभाऊ मुनघाटे व शाळा समन्वयक डॉ. सुरेश लडके यांच्या मार्गदर्शनाखाली थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस विविध उपक्रमाव्दारे मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला.
मागील तीन दिवसांपासून विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने पाढे पाठांतर, भूमितीय आकृती ओळख, प्रश्नमंजुषा,पोस्टर स्पर्धा, गणितावर आधारित कवितांचे सादरीकरण, गणितीय परिपाठ,बहुपर्यायी गणितीय परीक्षा यासह अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम दिवशी थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गणितीय नृत्य सादर करण्यात आले, गणितीय रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले.विविध स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन प्रोत्साहन देण्यात आले. याप्रसंगी विर्द्याथ्यांना मार्गदर्शन करतांना शाळेचे मुख्याध्यापक चेतन गोरे यांनी सांगीतले की विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी भारतीय गणितज्ञांनी केलेल्या कार्याची ओळख करून देण्याची नितांत गरज आहे.रामानुजन हे निसर्गाचा एक गणिती चमत्कार होते असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या गणितज्ञाने अत्यंत प्रतिकुल परिस्थितितही स्वःताला गणितासाठी आयुष्यभर झोकून दिले. अशा थोर गणितज्ञाकडून प्रेरणा घेऊन आपली प्रगती करणे ही काळाची गरज आहे. इतर उपस्थितांनी सुध्दा मार्गदर्शन करून गणिताचे दैनंदिन जीवनातील व भविष्यातील महत्व सांगितले.
यावेळी प्रामुख्याने पर्यवेक्षिका रिझवाना पठाण, उपमुख्याध्यापिका जयश्री मुळे, शाळेच्या माजी शिक्षिका सोनू बावणे, प्रिया वरघंटे,गणित विभागप्रमुख नंदिनी भेंडारे, विभागप्रमुख सूरज चलाख, मंगला गावंडे,गणित शिक्षक निकेश तिंमा, निखिल मस्के, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित शिक्षक राहुल मडावी, संचालन विद्यार्थी भाग्यलक्ष्मी कोल्हे व जागृती मेश्राम तर आभार निखिल मस्के यांनी मानले.
प्रा. शेषराव येलेकर विदर्भ चीफ न्यूज ब्युरो