पोलीस मुख्यालयातूनच ट्रक चोरी! अवैध मुरूम प्रकरणात जप्त वाहन अज्ञात चोरट्यांनी पळवले; भंडाऱ्यात खळबळ
भंडारा :
अवैध गौण खनिज वाहतुकीप्रकरणी जप्त करण्यात आलेला ट्रक थेट पोलीस मुख्यालयातूनच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना भंडारा शहरात उघडकीस आली असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सुरक्षेखाली ठेवलेले वाहन चोरीला जाणे म्हणजे गंभीर बाब ठरत असून, पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
⚖️ काय आहे संपूर्ण प्रकरण?
दि. 26 डिसेंबर 2025 रोजी भंडारा उपविभागीय अधिकारी कु. माधुरी तिखे यांच्या आदेशाने अवैध गौण खनिज (मुरूम) वाहतूक प्रकरणात
ट्रक क्रमांक MH-40-TH-4798 हा वाहन चालक व मालक मारोती (गोलू) चैतराम बसोडे, रा. बेला याच्याकडून जप्त करण्यात आला होता.
सदर ट्रकमध्ये सुमारे 05 ब्रास मुरूम परवाना नसताना वाहतूक केली जात असल्याचे आढळून आल्याने पोलीस स्टेशन कारधा येथे अप.क्र. 07/2026 अन्वये
भा.न्या.संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर संबंधित ट्रक पोलीस मुख्यालय भंडारा येथे डिटेन (ताब्यात) ठेवण्यात आला होता.
🚨 ट्रक अचानक गायब!
दि. 01 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता, तहसीलदार भंडारा यांच्या वतीने तलाठी विठ्ठल बाबासाहेब मुंढे हे जप्त ट्रकची पाहणी करण्यासाठी पोलीस मुख्यालयात गेले असता, सदर ट्रक तेथे आढळून आला नाही.
पोलीस मुख्यालयासारख्या सुरक्षित ठिकाणाहून ₹15 लाख किमतीचा ट्रक अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली.
🔍 अज्ञात चोराविरोधात गुन्हा
या प्रकरणी तलाठी विठ्ठल मुंढे यांच्या तोंडी तक्रारीवरून
पोलीस स्टेशन भंडारा येथे अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास मपोउपनि. तुमसरे हे करीत आहेत.
❓ गंभीर प्रश्न उपस्थित
पोलीस मुख्यालयातून जप्त वाहन चोरीला जाणे ही अत्यंत गंभीर बाब असून —
ट्रक चोरीला नेमका कोणी व कसा नेला?
सीसीटीव्ही फुटेज तपासले का?
यात आतील सहभाग आहे का?
अवैध मुरूम प्रकरणातील आरोपींनीच ट्रक पळवला का?
असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
🔥 प्रशासनासाठी कसोटी
अवैध खनिज प्रकरणे, त्यावर कारवाई आणि त्यानंतर जप्त मालाची सुरक्षा — या सगळ्या बाबींवर या घटनेमुळे संशयाची छाया पडली आहे. आता या ट्रक चोरीचा छडा लावण्यात भंडारा पोलिसांना किती यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
