BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदार ठेवीबाबतचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला आढावा

Summary

मुंबई, दि. १९ : पॅनकार्ड क्लब लि. मध्ये गुंतवणूकदारांनी आर्थिक गुंतवणूक केली आहे.  या गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळावा या संबंधी सुरू असलेल्या प्रक्रियेचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यापूर्वी ११ जून २०२५ रोजी आढावा घेतला होता. त्यानुषंगाने गृह राज्यमंत्री […]

मुंबई, दि. १९ : पॅनकार्ड क्लब लि. मध्ये गुंतवणूकदारांनी आर्थिक गुंतवणूक केली आहे.  या गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळावा या संबंधी सुरू असलेल्या प्रक्रियेचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यापूर्वी ११ जून २०२५ रोजी आढावा घेतला होता. त्यानुषंगाने गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज मंत्रालय येथे पुन्हा आढावा बैठक घेतली.

महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम  १९९९ अन्वये पॅनकार्ड क्लब लि. या वित्तीय संस्थेने केलेल्या सुमारे ७ हजार कोटी रुपयांच्या फसवणूक संदर्भात गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

पॅनकार्ड क्लब लि. बाधित गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळाला पाहिजे, यासाठी या प्रकरणी ज्या मालमत्ता संरक्षित केल्या आहेत त्या संदर्भात न्यायालयाचा निर्णय येत नाही तो पर्यंत कोणताही बेकायदेशीर व्यवहार होऊ नये याची संबधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. तसेच किती मालमत्ता संरक्षित आहेत, किती मालमत्ता अद्यापि संरक्षित केलेल्या नाहीत याची माहिती संकलित करावी. सक्षम प्राधिकारी यांच्याकडील प्रलंबित कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधित सर्व जिल्हाधिकारी यांची देखील बैठक घेण्यात येईल असे राज्यमंत्री श्री. कदम यांनी यावेळी सांगितले.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, पॅनकार्ड क्लब लि. बाधित गुंतवणूकदारांचा पैसा त्यांना मिळावा यासाठी सर्वसंबंधित यंत्रणानी समन्वयाने सर्व कायदेशीर प्रकिया तातडीने करावी आणि गुंतवणूकदारांचे पैसे लवकर परत देण्याची कार्यवाही करावी.

या बैठकीस प्रधान सचिव (गृह) अनुपकुमार सिंह, पोलिस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक दीपक देवराज, उपसचिव यमुना जाधव यांच्यासह सेबीचे वरिष्ठ अधिकारी, तपास अधिकारी, सक्षम प्राधिकारी आणि गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *