पूर्व विदर्भात पावसाचे आक्रमण भंडारा गोंदिया जिल्ह्यात पानी शिरल्याने लोकं छतावर अडकली
Summary
भंडारा/गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे चार मीटरने उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नदी काठावरील गावात […]
भंडारा/गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे चार मीटरने उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नदी काठावरील गावात पाणी शिरल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. आता जरी पावसाने उसंत घेतली असली तरी जिल्ह्यातील वैनगंगा, बावनथडी नदीला पूर आला असून गोसेखुर्द धरण, बावनथडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तरी पाऊस इतका होता की नदी काठावरील गावात पाणी शिरलं आहे, तर काही गावात लहान मुलं गावात नाव (बोट) चालवताना दिसत आहेत. या पावसामुळे सगळ्यात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, नदी काठावरील शेतीमध्ये पाणीच पाणी दिसत आहे. शेतीला तलावाचं स्वरूप आल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे शासनांनी लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
गोसे खुर्द धरणाचे 33 दरवाजे 4 मीटरने उघडले
2005 नंतर पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा भंडारा शहराला बसला आहे. भोजापूर पुलावर पाणी असल्याने भंडारा-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच तसेच भंडारा तुमसर रस्ता सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. भंडारा शहरातील बऱ्याच भागांमध्ये हा पुराचे पाणी शिरले असून बऱ्याच लोकांना त्यांच्या घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डेपो मध्ये आणि बसस्थानकामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे लालपरीची चाकं थांबलेली आहेत.
भंडाऱ्यात पूर, दोन राज्यांशी संपर्क तुटला, वैनगंगेला महापूर, तीन जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
शनिवारपासून भंडाऱ्यामध्ये पाऊस पूर्णपणे थांबला आहे. मात्र, मध्यप्रदेशच्या संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्याच्या पुजारीटोला आणि आणि कालीसागर या धरणातील पाणी सोडल्यामुळे भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. भंडारा शहराला सर्व बाजूने पाण्याचा वेढा निर्माण झाला आहे. त्यामुळे भंडारा तुमसर रोडवरील मेहंदी पुलावर चार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. हे पाणी जवळपास 5 किलोमीटरपर्यंत पसरलेलं असल्याने दाभा गावातील घरामध्ये पाणी शिरले आहे.
भंडारा-नागपूर मार्गही बंद
तर राष्ट्रीय महामार्ग 6 वर नागपूर नाक्याजवळील भोजापूर नाल्यावर जवळपास 5 फूट पाणी असल्याने भंडारा-नागपूर मार्गही सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे ट्रकच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. शहरातील ग्रामसेवक कॉलनी, कस्तुरबा गांधी वार्ड, टाकळी भगतसिंग वार्ड, सिंधी कॉलनी, गुरुनानक कॉलनी, प्रगती कॉलनी, मेंढा परिसर महात्मा ज्योतिबा कॉलोनी, गणेशपूर, भोजापूर परिसरात या पुराचे पाणी शिरले आहे. प्रगती कॉलनी मधील जवळपास पंधरा ते वीस घर 5 ते 6 फूट पाण्याने वेढलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घराच्या छतावर आश्रय घेतलेला आहे.
तब्बल पंधरा वर्षानंतर पूरपरिस्थिती
दुसरीकडे गोसे धरणाचे दारे उघडल्याने याचा फटका भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्याला बसला असून इटान गावातील 200 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. तब्बल पंधरा वर्षानंतर पुराची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 2015 मध्ये सुद्धा संजय सरोवर आणि इतर धरणातून पाणी सोडल्याने अशीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा शहराप्रमाणे, भंडारा ग्रामीण भागातील परिसरात हा पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. तुमसर तालुका आणि पवनी तालुक्यातही पुराचे पाणी बऱ्याच गावांमध्ये शिरलं आहे. त्यामुळे या सर्व भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.