BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

पावसाळ्याची पूर्वतयारी : सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज

Summary

मुंबई, दि. 21 : पावसाळ्यात रस्ते व पूल सुस्थितीत राहावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यापक उपाययोजना राबविल्या असून, राज्यातील प्रमुख रस्त्यांचे व पुलांचे दुरुस्ती व देखभाल काम वेगाने सुरू आहे. राज्यातील प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग यांची […]

मुंबई, दि. 21 : पावसाळ्यात रस्ते व पूल सुस्थितीत राहावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यापक उपाययोजना राबविल्या असून, राज्यातील प्रमुख रस्त्यांचे व पुलांचे दुरुस्ती व देखभाल काम वेगाने सुरू आहे.

राज्यातील प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग यांची दैनंदिन देखभाल व वेळोवेळी दुरुस्ती करून हे रस्ते वाहतुकीसाठी योग्य राहावेत, यासाठी विभाग सतर्क आहे. अतिवृष्टीमुळे पाण्याखाली जाणाऱ्या पुलांवर खबरदारीचा उपाय म्हणून सावधानतेचे फलक लावण्यात येत असून, दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी वाहतुकीसाठीचे पर्यायी मार्ग (diversion) योग्य स्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात विशेष खबरदारी घेण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सध्या एकूण 16,519 लहान-मोठे व ब्रिटीशकालीन पूल आहेत. यापैकी 451 पुलांचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. मागील 10 वर्षांत 1,693 पुलांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

धोकादायक स्थितीत असलेल्या किंवा वाहतुकीसाठी बंद असलेल्या पुलांच्या दोन्ही बाजूंना सावधानतेचे फलक व बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. अशा रस्ते व पुलांची स्थिती शासन स्तरावरून सातत्याने तपासली जात आहे.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर वेळीच उपाय करता यावा, यासाठी एक प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात आली असून, त्याअंतर्गत अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुका स्तरापर्यंत नियंत्रण कक्ष (Control Room) कार्यरत असून, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता हे या कक्षांचे वेळोवेळी निरीक्षण करत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या तयारीमुळे पावसाळ्यातील आपत्कालीन स्थितींना सक्षमपणे तोंड देणे शक्य होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *