पालकमंत्र्यांनी घेतली नांदगाव येथील बाधित कुटुंबांची घेतली भेट बाधित कुटुंबांना पालकमंत्र्यांच्या हस्ते अन्नधान्याचे वितरण
सातारा दि. 27 (जिमाका) : नांदगाव ता. कराड येथे अतिवृष्टीमुळे दक्षिण मांड नदीवरील बंधाऱ्याचे रेलिंग तूटून नुकसान झाले आहे, तसेच गावातील घरामध्ये पुराचे पाणी शिरले होते. त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली. तसेच राज्य शासनाकडून या बाधित कुटुंबियांना १० किलो गहू व १० किलो तांदळाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गट विकास अधिकारी आबासाहेब पवार, इरीगेशनचे उपअभियंता श्री. धोत्रे, सरपंच हंबीर पाटील, उपसरपंच अधिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, अमोल कांबळे, विजय पाटील, सागर कुंभार, ग्रामसेवक मोहन शेळक, तलाठी ढवणे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. बाधित झालेल्या कुटुंबांना शासनाने अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रति कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ देण्यात येणार आहे. तसेच बाधित कुटुंबाकडून मागणी झाल्यास तांदळाचे प्रमाण वाढवून एकूण 20 किलो अन्नधान्य , 5 किलो तूर डाळ व 5 लिटर केरोसिन देण्यात येणार आहे.
याप्रसंगी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते एकूण 53 बाधित कुटुंबांना 10 किलो गहू व 10 किलो तांदळाचे वाटप करण्यात आले. तसेच यानंतर कराड तालुक्यातील पोतले येथेदेखील बाधित कुटुंबांची भेट घेऊन गहू आणि तांदळाचे वाटप केले.