पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाटण मतदारसंघातील विकास कामांचा आढावा
Summary
सातारा, दि.२० : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभगृहात घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य […]
सातारा, दि.२० : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभगृहात घेतला.
या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाणंद रस्त्यांचा आढावा घेताना श्री. देसाई म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते खूप महत्त्वाचे आहेत. जे पाणंद रस्ते मंजूर आहेत त्यांची कामे येत्या जून २०२३ पर्यंत पूर्ण करावीत. पाटण विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामांना निधी आला आहे ती कामे लवकरात लवकर सुरु करावीत. ही कामे करीत असताना कामांचा दर्जा चांगला ठेवावा.
अर्थसंकल्पीय कामे, जिल्हा नियोजन फंडातील कामे, कोयना भूकंप पुनर्वसन निधी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ठोक निधी, डोंगरी विकास, जल जीवन मिशन व इतर फंडातून प्राप्त विकास कामेही सुरु करावीत. तसेच मौजे मळे, कोळणे, पाथरपुंज, पुनवली, किसरुळे या गावातील व्याघ्र प्रकल्पातील खातेदार यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल. जिल्हा परिषद परिसरातील सातारा जिल्हा लोकल बोर्डाची इमारत वारसा स्थळ म्हणून विकसित करुन जतन करण्यात येणार आहे, याचाही आराखडा तयार करावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
000