पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभुराज देसाई यांची आंबेघरला भेट. शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
सातारा, दि.24 (जिमाका): पाटण तालुक्यातील आंबेघर येथे भूस्खलन झाले होते या ठिकाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी भेट देऊन तिथल्या लोकांचे सांत्वन करुन धीर दिला. शासन तुमच्या पाठिशी असून शासनातर्फे सर्वतोपरी मदत मिळवून देणार असल्याचे यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
आंबेघरमध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले असून यामध्ये 15 नागरिक दगावल्याची शक्यता आहे. आतापर्यत एनडीआरएफच्या मदतीने 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यातील 6 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून ढिगाऱ्यातून उर्वरित मृतदेह संध्याकाळपर्यंत काढण्याच्या सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आंबेघरला भेट देऊन एनडीआरएफच्या टीमकडून सुरु असलेल्या बचाव कार्याची माहिती घेतली.