“पात्र कर्मचाऱ्यांना उत्तीर्ण घोषित करुन त्यांना अनुज्ञेय लाभ द्या ! म्युनिसिपल कर्मचारी सेना
Summary
राज्य शासनाच्या धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत कालबद्ध पदोन्नती मिळावी याकरीता पालिकेने परिपत्रक निर्गमित केले आहे. परिपत्रक क्र. साप्रवि/आरजीसेल/१० दि.०५.०७.२०२१ अन्वये कर्मचाऱ्यांना १०,२० व ३० वर्षाच्या नियमित सेवेमध्ये तीन लाभांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दि. ०१.०१.२०१६ पासून अंमलात आली […]
राज्य शासनाच्या धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत कालबद्ध पदोन्नती मिळावी याकरीता पालिकेने परिपत्रक निर्गमित केले आहे. परिपत्रक क्र. साप्रवि/आरजीसेल/१० दि.०५.०७.२०२१ अन्वये कर्मचाऱ्यांना १०,२० व ३० वर्षाच्या नियमित सेवेमध्ये तीन लाभांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दि. ०१.०१.२०१६ पासून अंमलात आली आहे. त्या अनुषंगाने मनपातील बहुतांश संवर्गांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार तीन लाभ अनुज्ञेय करण्यात आले आहेत. तथापि, काही संवर्गांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय होण्याकरिता वरच्या पदासाठीची ‘अर्हताकारी परीक्षा’ उत्तीर्ण होणे आवश्यक असल्यामुळे आणि सदर परिक्षा घेतल्या जात नसल्याने त्या-त्या संवर्गातील कर्मचार्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला नाही. परिणामी बहुतांश कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच पदावर व एकाच वेतनश्रेणीत काम करावे लागत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची राज्य शासनाच्या धर्तीवर अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य शासन सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कर्मचार्यांना विहित वेळेत अनुज्ञेय व्हावा याकरीता शासनाकडून कर्मचार्यांना पुरेशा प्रमाणात संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
उदा.
(१) सेवांतगर्त आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय होण्याकरीता ज्या पदांना परीक्षा उत्तीर्ण होण्याची आवश्यकता आहे, अशा पदांची वर्षातून एकदा अथवा दोनदा परीक्षा आयोजित केली जाते.
(२) से.आ.प्र.यो. लाभ अनुज्ञेय होण्याकरीता ज्या पदांना वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची अथवा व्यावसायिक प्रशिक्षणाची आवश्यकता असते त्यांना वर्षातून एकदा अथवा दोनदा प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.
वरील बाबींचा विचार करता बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचार्यांनाही विहित वेळेत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय व्हावा व त्यांनाही संपूर्ण सेवेत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार तीन लाभ मिळावेत या दृष्टिकोनातून दरवर्षी परीक्षेचे आयोजन होणे आवश्यक असल्याची बाब ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या सह-आयुक्तांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
प्रस्तुत प्रकरणी परिपत्रक क्रमांक साप्रवि/४३४/मप दि.३१.०७.२०१५ अन्वये दिनदर्शिकेतील अनुक्रमांक ३ ते ८ वरील पदांच्या कालबध्द पदोन्नतीचा फायदा अनुज्ञेय आहे. त्यासाठी विहीत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. त्यामुळे सदर परीक्षांचे आयोजन दरवर्षी होणे आवश्यक असताना तसे स्पष्ट निर्देश असतांनाही दरवर्षी परीक्षा आयोजित न करणे ही बाब अत्यंत गंभीर असून कर्मचार्यांचे दूरगामी नुकसान करणारे आहे. म्हणुन “ज्या वर्षी परिक्षा आयोजित केली नसेल त्या वर्षी कर्मचार्यांचे नुकसान होऊ नये म्हणून परिक्षेस पात्र असणार्या सर्व कर्मचाऱ्यांना उत्तीर्ण घोषित करुन प्रचलीत परिपत्रकांप्रमाणे सर्व अनुज्ञेय लाभ देण्यात यावेत, अशी मागणी सेना युनियनने केली आहे.
परिपत्रक क्रमांक साप्रवि/४३४/मप दि.३१.०७.२०१५ च्या दिनदर्शिकेतील अनुक्रमांक ३ ते ८ पदांची दरवर्षी परीक्षा घेण्यात यावी व कर्मचार्यांवर होणारा अन्याय दूर करावा अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.