क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

पहाटे पेपर वाटपासाठी गेलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू; अज्ञात ट्रकचा शोध घेण्यात भंडारा पोलिसांना यश

Summary

भंडारा | प्रतिनिधी भंडारा शहरात पहाटे वृत्तपत्र वाटपासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा अज्ञात ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून, अवघ्या काही तासांत भंडारा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी ट्रकचा शोध घेत मोठी कारवाई केली आहे. ओम नगर, गोंडी टोली, […]

भंडारा | प्रतिनिधी
भंडारा शहरात पहाटे वृत्तपत्र वाटपासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा अज्ञात ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून, अवघ्या काही तासांत भंडारा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी ट्रकचा शोध घेत मोठी कारवाई केली आहे.
ओम नगर, गोंडी टोली, खोकरला येथील रहिवासी इशा शंकर पटले (वय ४०) यांनी पोलीस ठाणे भंडारा येथे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती शंकर भोजलाल पटले (वय ४५) हे नेहमीप्रमाणे ११ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास टीव्हीएस मोपेड (MH 36 AS 2470) वरून शहरात वृत्तपत्र वाटपासाठी गेले होते. काम उरकल्यानंतर ते नॅशनल हायवे मार्गे परत येत असताना चोले हॉस्पिटलजवळ नागपूरकडून भंडाऱ्याकडे येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात शंकर पटले यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपराध क्रमांक ८८/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुधे करत आहेत.
मा. पोलीस अधीक्षक भंडारा, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक (ठाणेदार) यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तात्काळ तपास सुरू केला. डी.बी. पथकाचे प्रभारी सपोनि राजेश खंदाडे, सफौ तुळशीदास मोहरकर, पो.शि. अमोल मस्के, पो.शि. शेषराव राठोड व पो.शि. कोमल ईश्वरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघात करून पळून गेलेला ट्रक हा आयशर कंपनीचा काळ्या रंगाचा असून त्याचा क्रमांक MH 36 F 4851 असल्याचे स्पष्ट झाले. नाकाबंदी अ‍ॅपद्वारे तपास केल्यानंतर हा ट्रक मोहाडी येथील नेहरू वार्डात राहणाऱ्या आकाश एकनाथ मोटघरे याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डी.बी. पथकाने मोहाडी येथे जाऊन ट्रकचा मालक व चालक यांना ताब्यात घेऊन तपासी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. संबंधित अपघातग्रस्त ट्रक पोलीस ठाणे भंडारा येथे जमा करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुधे व डी.बी. पथक भंडारा हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. भंडारा पोलिसांच्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे मृताच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.

संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *