कोल्हापुर महाराष्ट्र हेडलाइन

पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही कोल्हापूर प्रेस क्लबच्या वार्षिक पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

Summary

कोल्हापूर, दि.16 (जिमाका) : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली […]

कोल्हापूर, दि.16 (जिमाका) : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. शासन चालवित असताना माध्यमातील अनेक बातम्यांमधून वेगवेगळ्या चुका लक्षात येतात व त्या चुका दुरूस्त करून अधिक चांगल्या पध्दतीने काम करता येत, असे प्रतिपादनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केले.

कोल्हापूर प्रेसक्लबच्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, फोटोग्राफर, कॅमेरामन आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन व अन्य मान्यवरांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकरी, कष्टकरी, महिला यांच्यासह सर्वसामान्यांना न्याय देणारे हे सरकार आहे. कोरोनाकाळात पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केले. कोरोना, पूरपरिस्थितीसह राज्यात आजवर आलेल्या अनेक संकटकालीन परिस्थितीत पत्रकारांनी खूप चांगले काम करुन आदर्श निर्माण केला आहे. पत्रकारांसाठी आम्ही कोरोनाकाळात तपासणीचे विशेष शिबीरांचे आयोजन केले होते. पत्रकार चौकस बुध्दीने, जागृत राहून समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात. सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. शासनाच्या उणिवा दाखवतानाच समाजातील सर्वसामान्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्या त्या ठिकाणची चांगली कामे, महत्त्वाकांक्षी प्रकल्प याचेही लेखन, चित्रण पत्रकारांनी करुन ते समाजासमोर आणावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केली. पत्रकारांच्या घरकुल योजनेसाठीचा टॅक्स कमी करण्याबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येईल. तसेच कोल्हापुरात पत्रकार भवन उभारण्यासाठी जागेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर मध्ये आजवर आलेल्या पूर परिस्थिती तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या-त्या वेळी मदतीला धावून येत सहकार्याची भूमिका बजावली आहे, त्यांच्या पुढाकारानेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांसाठीचा निधी जागतिक बँकेकडून मिळणार आहे. प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर व कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्री व मान्यवरांचे स्वागत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे व उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनी केले. आभार प्रेस क्लबचे खजानिस बाबुराव रानगे यांनी मानले. सूत्रसंचालन पत्रकार समीर देशपांडे यांनी केले. मुख्यमंत्री कक्षात काम करणारे व कोल्हापूर जिल्ह्यात पुर्वी पत्रकारिता केलेले अमित हुक्केरीकर आणि प्रशांत साळोखे यांचा सन्मान प्रेस क्लबमार्फत करण्यात आला. याचबरोबर पत्रकार समीर देशपांडे यांचा सन्मान 12 वर्ष विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत अक्षरगप्पा उपक्रम राबविल्याबद्दल व पत्रकार बाबुराव रानगे यांचा सन्मान बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल केला.

पत्रकार पुरस्काराचे मानकरी – उत्कृष्ट पत्रकार संतोष पाटील तरुण भारत, उत्कृष्ट छायाचित्रकार बी डी चेचर सकाळ, उत्कृष्ट पत्रकार टीव्ही विजय केसरकर एबीपी माझा, उत्कृष्ट कॅमेरामन टीव्ही निलेश शेवाळे एबीपी माझा यांना देण्यात आला.

व्हाईट आर्मीकडून मुख्यमंत्री महोदयांना देवदूत पुरस्कार प्रदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर केलेल्या सामाजिक कामांसाठी व आपत्ती दरम्यान केलेल्या मदतीसाठी व्हाईट आर्मी या संस्थेने त्यांना देवदूत पुरस्कार देवून सन्मानित केले. हा पुरस्कार व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्या हस्ते देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *