निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर पळसखेडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Summary
औरंगाबाद, दि.4(जिमाका)- निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पळसखेडा ता. सोयगाव येथे त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ना.धों. महानोर यांचे पुणे येथे उपचार घेतांना निधन झाले होते. काल रात्री त्यांचे पार्थिव पळसखेडा येथील निवासस्थानी […]
औरंगाबाद, दि.4(जिमाका)- निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पळसखेडा ता. सोयगाव येथे त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ना.धों. महानोर यांचे पुणे येथे उपचार घेतांना निधन झाले होते. काल रात्री त्यांचे पार्थिव पळसखेडा येथील निवासस्थानी आणण्यात आले. आज सकाळपासून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली होती. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतातील सुलोचना बागेत शासकीय इतमामात अंत्यसंकार करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी पुष्पहार अर्पण करुन मानवंदना दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, सिल्लोडचे तहसीलदार रमेश जसवंत, सोयगावचे तहसीलदार मोहन हरणे आदी वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी पोलीस दलानेही मानवंदना दिली.
अंत्यसंस्कार समयी झालेल्या शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महानोर यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ‘पीक करपलं, पक्षी दूर देशी गेलं, गाळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबलं’ या महानोर यांच्या कवितेचे गायन सुदीपा सरकार यांनी केले. त्यांच्या पार्थिवास त्यांचे सुपूत्र बाळकृष्ण यांनी अंत्यसंस्कार केले. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, अविनाश जैन, दादा नेवे, राजा मयूर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर या मान्यवरांसह साहित्य क्षेत्रात कौतिकराव ठाले पाटील, रंगनाथ पठारे, दादा गोरे, श्रीकांत देशमुख, प्रा. ऋषिकेश कांबळे, अजीम नवाज राही, दासू वैद्य, चंद्रकांत पाटील, प्रतिभा शिंदे, अशोक कोतवाल अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
00000