पुणे महाराष्ट्र हेडलाइन

निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा अभ्यास करावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

Summary

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशदा येथे पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ पुणे, दि. १: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे व कोकण विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या […]

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशदा येथे पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ

पुणे, दि. १: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे व कोकण विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत यशदा येथे करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा व्यवस्थित अभ्यास करावा, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

यावेळी भारत निवडणूक आयोगाचे के. एफ. विलफ्रेड, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होते.

सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात आनंदाने सहभागी होत निवडणूक प्रक्रिया तटस्थपणे आणि ताणतणाव विरहीत राहून राबवावी, असे सांगून मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले, कर्मचाऱ्यांशी समन्वय ठेऊन पारदर्शक व भयमुक्त वातावरणात कामकाज होईल याची काळजी घ्यावी. प्रशिक्षणादरम्यान नियमांचे बारकाईने वाचन करुन शंकाचे निरसन करुन घ्यावे. आयोगाच्या सर्व सूचना पुस्तिकांमध्ये स्पष्टपणे नमूद असून आयोगाच्या संकेतस्थळावरही मोठी माहिती उपलब्ध आहे. याउपरही आयोगाकडून सदैव मार्गदर्शन होत असते, असे आवाहन त्यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करुन मतदान साहित्याचे वितरण सुलभतेने होईल यावर लक्ष देण्यात येत आहे. यापूर्वी निवडणुकीसाठी लागणारे साहित्य कुठूनही खरेदी केले तरी ते मुंबईला आणले जात व तेथून संबंधित जिल्ह्यांना वितरीत केले जात. मात्र यात होणारा विलंब आणि मनुष्यबळाचा वेळ आणि शक्तीचा अपव्यय लक्षात घेता आम्ही हे साहित्य खरेदी केलेल्या ठिकाणाहून थेट जिल्ह्यांना वितरीत करण्याचा प्रयोग केला असून यापुढे त्यावर अधिक भर दिला जाईल. निवडणूक प्रक्रियेवरील खर्च मर्यादेत होईल याकडेही लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्याची सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक निवडणूक पहिलीच निवडणूक असल्याप्रमाणे सामोरे जावे. निवडणुकीचे काम करताना हस्तपुस्तिका (हँडबुक) व मार्गदर्शिका (मॅन्युअल्स) बारकाईने वाचून सर्व शंकाचे निरसन करुन घ्या. वेळेचे बंधन पाळावे. मतदारांची ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी त्यांना मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी मदत करा. मतदार जागृतीसाठी निरंतरपणे स्वीप उपक्रम राबवावेत.

निवडणूक प्रक्रिया राबविताना सातत्याने विचारांचे आदान-प्रदान आवश्यक आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, कायद्यातील तरतुदींचे पालन करुन अभ्यासपूर्ण निर्णय घ्या. मतदारांना जास्तीत जास्त सुविधा देण्यात याव्यात. आवश्यक त्या ठिकाणी राजकीय पक्षांचा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या. राज्य घटनेने दिलेली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, सध्याच्या निवडणूका तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत अचूकतेला महत्त्व आहे. निवडणुकीसंदर्भात सर्व अभिलेख आता डिजीटल स्वरूपात संग्रहित केले जाते. मतदार याद्यांची शुद्धता महत्त्वाची असून ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याची सर्वांची जबाबदारी आहे. पुणे जिल्ह्यात सर्वांधिक मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया राबविताना प्रत्येकाची जबाबदारी व कालमर्यादा निश्चित केली आहे. त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. या प्रशिक्षणाला दोन विभागातील अधिकारी उपस्थित असल्याने आपापसात अनुभवांचे आदान-प्रदान करता येईल, असेही ते डॉ. दिवसे म्हणाले.

प्रास्ताविक उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले. प्रशिक्षणाला पुणे व कोकण विभागातील १२ जिल्ह्यातील सुमारे १५० अधिकारी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *