निवडणूक काळात रजा बंद; कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला किंवा पुढील रजा देण्याची मागणी
Summary
मुंबई | प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना रजा न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना संघटनेने महापालिका आयुक्तांना अधिकृत निवेदन पाठवून, रजा न मिळाल्याबद्दल कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात […]
मुंबई | प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना रजा न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना संघटनेने महापालिका आयुक्तांना अधिकृत निवेदन पाठवून, रजा न मिळाल्याबद्दल कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात यावा किंवा निवडणुकीनंतर पुढील तीन महिन्यांत रजा उपभोगण्याची सवलत द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापरेकर यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १६ जानेवारी २०२६ पर्यंत कोणत्याही प्रकारची रजा मंजूर केली जाणार नाही, असे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे महापालिकेतील कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना केवळ निवडणूक कामकाजासाठी सतत काम करावे लागत असून, त्यांना नियमित रजा तसेच इतर रजा उपभोगण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे या काळात अतिरिक्त कामाचा ताण सहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला देणे न्याय्य ठरेल, असे संघटनेचे म्हणणे आहे.
तसेच, निवडणूक कालावधीत रजा घेणे शक्य नसलेल्या कर्मचाऱ्यांना मार्च २०२६ पर्यंत साचलेल्या रजा वापरण्याची मुभा द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन संघटनेने महापालिका प्रशासनाला केले आहे.
या निवेदनाची प्रत ई-मेलद्वारेही महापालिका आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आली असून, आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे हजारो महापालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर
