नाल्याच्या बंधाऱ्यावर नशेचा अड्डा उघड – तरुणांच्या हातात गांजा, पोलिसांची अचानक कारवाई
भंडारा:- शहरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कडक पवित्रा घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शांत परिसरात नशेचा अड्डा थाटून गांजाचे सेवन सुरू असताना दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
दि. 25 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास, ग्राम नांदोरा टोली येथील नाल्याच्या बंधाऱ्याजवळ संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन जवाहरनगरच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली.
छाप्यादरम्यान प्रतिक अरविंद हेडावु (वय 19 वर्ष, रा. रामूप मंदिर वार्ड, भंडारा) आणि प्रणय योगीराज मेश्राम (वय 20 वर्ष, रा. तलाव वार्ड, लांखादुर रोड, साकोली) हे दोघेही गुंगीकारक अमली पदार्थ गांजाचे सेवन करताना तसेच गांजा बाळगताना आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अंदाजे 15 ग्रॅम गांजा (किंमत सुमारे 300 रुपये), प्लास्टिक बॉटलला जोडलेली लोखंडी नळी (किंमत 90 रुपये), माचीस तसेच मोपेड क्रमांक एम.एच. 36 ए.एम. 2715 (किंमत सुमारे 50 हजार रुपये) असा एकूण 50 हजार 391 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी फिर्यादीचा लेखी रिपोर्ट आणि वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारे पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे अपराध क्रमांक 450/2025 नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यातील कलम 27 व 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहवा 1229 हाके करत असून, या तरुणांना अमली पदार्थ कुठून मिळाले आणि यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
अमली पदार्थांच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुण पिढीला रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.
संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
