धार्मिक बिड महाराष्ट्र हेडलाइन

नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते; मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावरगाव येथील श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे भूमिपूजन

Summary

बीड, दि. ०५: नाथ संप्रदायाची परंपरा देशातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली परंपरा मानली जाते. देशभरात नाथ संप्रदायाचे अनुयायी, या परंपरेनुसार साधना करणारे साधू, संत, महंत आहेत, त्यांच्यासमवेत सामान्य माणसांचेही नाथ संप्रदायाशी नाते घट्ट आहे, असे सांगून मंदिर परिसर विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून […]

बीड, दि. ०५: नाथ संप्रदायाची परंपरा देशातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली परंपरा मानली जाते. देशभरात नाथ संप्रदायाचे अनुयायी, या परंपरेनुसार साधना करणारे साधू, संत, महंत आहेत, त्यांच्यासमवेत सामान्य माणसांचेही नाथ संप्रदायाशी नाते घट्ट आहे, असे सांगून मंदिर परिसर विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

सावरगाव (ता. आष्टी, जि. बीड) येथील श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजळे, श्री क्षेत्र नारायण गड संस्थान, बीडचे महंत शिवाजी महाराज, अश्वलिंग देवस्थान, पिंपळवंडीचे मधुकर महाराज शास्त्री, मदन महाराज संस्थान, कडाचे बबन महाराज बहिरवाल, बंकटस्वामी महाराज संस्थान, नेकपूरचे लक्ष्मण महाराज मेंगडे, ओम शिव गोरक्षनाथ योगी आस्थाना, अहिल्यानगरचे अशोकनाथ पालवे महाराज, नालेगाव, अहिल्यानगरचे मस्तनाथ महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नाथ संप्रदायाने भक्तीचा मार्ग दाखविला आहे. या भक्तीमार्गानेच मुक्तीचा मार्ग दाखविला आहे. नाथांनी हे आपल्या आचरणातून सिद्ध केले आहे. मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त येथे येण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो. मंदिर परिसर विकासाच्या विविध कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. रोप वेबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

भारत हा भाविकांचा देश आहे. सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. तेथे आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी गंगेत स्नान केले. भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. मात्र,  भक्तीमार्गामुळे आपली संस्कृती आणि संस्कार टिकून राहिले. वारकरी संप्रदाय आणि विविध पंथांनी ईश्वरी विचारांना आणि संस्कृतीला जिवंत ठेवले. मच्छिंद्रनाथांचे आशीर्वाद घेताना  भक्ती आणि माणुसकीचा संदेश आपल्याला मिळतो, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

आमदार सुरेश धस आणि मोनिका राजळे यांनी भाविकांची वाढती गर्दी पाहता कानिफनाथ मंदिरापासून मच्छिंद्रनाथ मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच मच्छिंद्रनाथ मंदिरापासून कानिफनाथ मंदिरापर्यंत रोप वे तयार व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, तर सचिव बाबासाहेब म्हस्के व कोषाध्यक्ष रमेश ताठे यांच्यासह सर्व विश्वस्तांनी मान्यवरांचे स्वागत केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *