नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

नागपुरातील आदरातिथ्याच्या आठवणी घेऊन जी -२० चे देश विदेशातील पाहुणे रवाना

Summary

नागपूर दि. २२ : जी -२० परिषदेअंतर्गत नागपुरात झालेल्या नागरी संस्थांच्या प्रारंभिक बैठकीत सहभागी झालेले देश विदेशातील बहुतेक पाहुणे आज मायदेशी रवाना झाले. दोन दिवसांच्या विचार मंथनानंतर आज पाहुण्यांनी पेंच प्रकल्पात व्याघ्र दर्शनाचा व देवलापार येथे संस्कृती दर्शनाचा लाभ घेतला. […]

नागपूर दि. २२ : जी -२० परिषदेअंतर्गत नागपुरात झालेल्या नागरी संस्थांच्या प्रारंभिक बैठकीत सहभागी झालेले देश विदेशातील बहुतेक पाहुणे आज मायदेशी रवाना झाले. दोन दिवसांच्या विचार मंथनानंतर आज पाहुण्यांनी पेंच प्रकल्पात व्याघ्र दर्शनाचा व देवलापार येथे संस्कृती दर्शनाचा लाभ घेतला.

जी -२० परिषद अंतर्गत झालेल्या सी -२० च्या प्रारंभिक बैठकीचा शानदार समारोप मंगळवारी झाला. त्यानंतर आज पहाटेच काही विदेशी पर्यटकांनी पेंच प्रकल्पात जाऊन व्याघ्रदर्शन घेतले तर अनेकांनी देवलापार येथील गौरक्षा केंद्रामध्ये विविध संस्कृती सोहळ्यात सहभाग घेतला.

विमानतळावर या बैठकीच्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांना दुपारी तीन वाजताच्या सुमारास विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला. माता अमृतानंदमयी यांच्यासोबत देश विदेशातील अनेक मान्यवर यावेळी विमानतळावर उपस्थितहोते. नागपूर शहराने केलेले आदरातिथ्य एक सुखद आठवण असल्याचे यावेळी पाहुण्यांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाने या बैठकीची तयारी केली होती. विविध सामाजिक संघटनामार्फत होत असलेल्या या आयोजनात कोणतीही कमी राहू नये यासाठी प्रशासन झटत होते. विमानतळावर विविध सामाजिक संघटनातील पदाधिकारी, आयोजन समितीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागपूरमध्ये 20 व 21 मार्च रोजी जी -20 अंतर्गत सी -20 च्या प्रारंभिक बैठकीचे स्थानिक रॅडिसन ब्लू हॅाटेल येथे आयोजन करण्यात आले होते. विदेश मंत्रालयाच्या अंतर्गत स्थानिक सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या या जागतिक स्तरावरील बैठकीच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर समारोप सत्राला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याशिवाय, सी -20 परिषदेच्या उदघाटक माता अमृतानंदमयी, नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी, जी-20 चे शेरपा तथा भारताचे माजी राजदूत विजय नांबियार, जी -20 चे शेरपा तसेच विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभय ठाकूर, सी-20 सचिवालयाचे संरक्षक डॅा. विनय सहस्त्रबुद्धे, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे, सुप्रसिद्ध व्यावसायिक तथा स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांच्यासह नागरी संस्थांचे प्रतिनिधी दोन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमात सहभागी झाले होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *