नवगठित कोंढाळी नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षांसमोर ‘काटेरी मुकुट’ नियोजन, पारदर्शकता व कठोर निर्णयांची कसोटी – आमदार चरणसिंग ठाकूर
Summary
कोंढाळी | प्रतिनिधी — नवगठित कोंढाळी नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणारे नगराध्यक्ष योगेश शेषराव चाफले यांच्यासमोर मोठी आव्हाने उभी असून, हे पद म्हणजे सन्मानासोबतच जबाबदारीची आणि निर्णयक्षमतेची कठोर कसोटी असल्याचे प्रतिपादन आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या […]
कोंढाळी | प्रतिनिधी — नवगठित कोंढाळी नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणारे नगराध्यक्ष योगेश शेषराव चाफले यांच्यासमोर मोठी आव्हाने उभी असून, हे पद म्हणजे सन्मानासोबतच जबाबदारीची आणि निर्णयक्षमतेची कठोर कसोटी असल्याचे प्रतिपादन आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केले.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. “पहिले नगराध्यक्षपद म्हणजे काटेरी मुकुट आहे. नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीचा पाया मजबूत करणे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि मर्यादित साधनसंपत्तीतून नियोजनबद्ध विकास साधणे हे मोठे आव्हान आहे. मात्र योग्य नियोजन, पारदर्शक प्रशासन आणि ठाम निर्णयक्षमता असेल, तर कोंढाळीचा सर्वांगीण विकास निश्चितच साधता येईल,” असे स्पष्ट मार्गदर्शन त्यांनी केले.
डी.पी. प्लॅनमधून विकासाची दिशा
नगरपंचायतीच्या नियोजित विकासासाठी विकास आराखडा (डी.पी. प्लॅन) अत्यंत महत्त्वाचा असून, तो लवकरच तयार होत असल्याची माहिती आमदार ठाकूर यांनी दिली. या आराखड्याच्या माध्यमातून अतिक्रमणमुक्त व प्रशस्त रस्ते, नियोजित बाजारपेठ, मजबूत नाल्या व पावसाळी पाणी व्यवस्थापन, शैक्षणिक व क्रीडा सुविधा तसेच नागरी सोयी-सुविधांचा समतोल विकास साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छतेची सुरुवात लोकप्रतिनिधींपासूनच
नगर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची सुरुवात नगराध्यक्ष व नगरसेवकांनी स्वतःपासून करावी, असे आवाहन करत आमदार ठाकूर यांनी “नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण नगरीचे पालकत्व तुमच्याकडे आहे. निर्णय कठोर असतील, पण ते लोकहिताचे असले पाहिजेत. विकास करताना कोणतीही व्यक्ती दुखावली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी,” असे नमूद केले.
नगर विकास विभागाच्या योजना
कोंढाळी नगरपंचायतीच्या विकासासाठी नगर विकास विभागाच्या विविध योजनांतून निधी व प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन देत आमदार ठाकूर यांनी स्वच्छ भारत अभियान (नागरी), अमृत योजना, १५वा वित्त आयोग निधी, राज्य शासनाच्या नगरोत्थान व वैशिष्ट्यपूर्ण योजना तसेच क्रीडा व शैक्षणिक सुविधा विकास योजनांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. केंद्र व राज्य शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
वाहतूक कोंडी व शिक्षण सुविधांवर भर
वर्धा टी-पॉइंटवरील वाहतूक कोंडी ही कोंढाळीसमोरील गंभीर समस्या असून, ती सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन उड्डाणपुलाचा मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन आमदार ठाकूर यांनी दिले.
दरम्यान, प्रशासक धनंजय बोरीकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी कोणताही पूर्वग्रह न ठेवता एकमताने काम करावे, असे आवाहन केले. खेळाचे मैदान, नगरपंचायत सभागृह, डंपिंग यार्ड यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी नगर विकास विभाग व आमदारांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक मागण्या व मनोगते
कार्यक्रमात प्रमोद चाफले, प्रज्वल धोटे, राहुल नासरे यांनी सायखोड-हेटी व शिरमी भागातील नागरिकांसाठी शिरमी येथे उच्च प्राथमिक शाळेची मागणी केली. प्रमोद चाफले यांनी खेळाचे मैदान व नगरपंचायत भवनाची मागणी मांडली. यावेळी मुन्ना सेंगर व चंद्रशेखर चिखले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सुवर्णकाळाची अपेक्षा
कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश चाफले व सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून कोंढाळी नगरपंचायतीचा सुवर्णकाळ सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्षांसह सर्व १७ नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाला सी.ओ. डॉ. नरेंद्र बेंबरे, बाल किसन पालीवाल, लताबाई धारपुरे, मोहन ठवळे यांच्यासह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष नगरसेवकांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जायभाये यांनी केले. समारोपप्रसंगी कोंढाळी नगरपंचायतीच्या स्वच्छतेसाठी नव्याने दाखल पाच घंटागाड्या व एका ट्रॅक्टरचे लोकार्पण करण्यात आले.
