धुळे नई दिल्ली महाराष्ट्र हेडलाइन

धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार डिजिटल प्रशासनात आदिवासी गावाची भरारी

Summary

नवी दिल्ली ६: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत ही 100 टक्के आदिवासी गाव असूनही डिजिटल प्रशासन आणि पारदर्शक सेवांच्या क्षेत्रात अग्रेसर ठरली आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवत या ग्रामपंचायतीने राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स […]

नवी दिल्ली ६: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत ही 100 टक्के आदिवासी गाव असूनही डिजिटल प्रशासन आणि पारदर्शक सेवांच्या क्षेत्रात अग्रेसर ठरली आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवत या ग्रामपंचायतीने राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये सुवर्ण पदक पटकावून रोहिणी गामपंचायतीने ग्रामीण स्तरावर तांत्रिक स्वावलंबनाचे अनुकरणीय उदाहरण निर्माण केले आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतीने डिजिटल प्रशासन आणि पारदर्शक सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीतून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि जन तक्रार विभाग (DARPG) तसेच पंचायती राज मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ‘राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025’ मध्ये रोहिणी ग्रामपंचायतीने ‘ग्रासरूट लेव्हल इनिशिएटिव्हज’ श्रेणीत सुवर्णपदक पटकावले आहे. या पुरस्काराचे वितरण 9 जून 2025 रोजी विशाखापट्टणम येथील 28व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत होणार असून, ग्रामपंचायतीला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे.

देशभरातील 1.45 लाखांहून अधिक अर्जांमधून कठोर निवड प्रक्रियेतून रोहिणी ग्रामपंचायतीने हा सन्मान मिळवला. त्रिपुरातील वेस्ट माजलिशपूर ग्रामपंचायतीला रौप्य पदक, तर गुजरातच्या पलसाणा आणि ओडिशातील सुआकाटी ग्रामपंचायतींना ज्युरी पुरस्कार मिळाले. रोहिणी ग्रामपंचायतीने महाऑनलाइन आयडीद्वारे 956 हून अधिक सेवा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे ऑनलाइन वितरण, तसेच महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य आणि पशुसंवर्धन क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे.

अनुसूचित क्षेत्रातील पेसा गाव असलेल्या रोहिणीने जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी पूर्णपणे ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. नागरिकांना घरबसल्या व्हॉट्सअॅप आणि ईमेलद्वारे प्रमाणपत्रे मिळतात. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सात कामकाजाच्या दिवसांत सेवा वितरण, ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा आणि वापरकर्ता-अनुकूल पोर्टल यामुळे ही प्रणाली विशेष प्रभावी ठरली आहे. याशिवाय, ग्रामपंचायतीने युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी संवाद साधला आहे.

100 टक्के आदिवासी गाव असूनही रोहिणी ग्रामपंचायतीने डिजिटल इंडियाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. शाळा, अंगणवाडी, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात ई-गव्हर्नन्सचा वापर करून ग्रामस्थांना कार्यक्षम सेवा पुरवल्या जात आहेत. यापूर्वीच रोहिणी ग्रामपंचायतीला ई-गव्हर्नन्स ग्रामपंचायत म्हणून राज्य शासनाने सन्मानित केले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *