धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस द्या – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अप्पर मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश
Summary
चंद्रपूर | प्रतिनिधी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस (प्रोत्साहनपर रक्कम) देण्याची आग्रही मागणी केली आहे. […]
चंद्रपूर | प्रतिनिधी
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस (प्रोत्साहनपर रक्कम) देण्याची आग्रही मागणी केली आहे. या मागणीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अप्पर मुख्य सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंगळवार, दि. २३ डिसेंबर रोजी मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या या भेटीत आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांवर वाढत्या उत्पादन खर्चाचा मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान
पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणावर धान लागवड होते. मात्र चालू वर्षात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खत, बियाणे, मजुरी व इतर खर्चात झालेली वाढ लक्षात घेता शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, त्याला दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
मागील वर्षी मिळाला होता मोठा दिलासा
मागील खरीप हंगामात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस देण्याचा शासन निर्णय झाला होता. त्या निर्णयामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १६२८ कोटी रुपयांची विक्रमी रक्कम जमा झाली होती. त्याच धर्तीवर यंदाही धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हिवाळी अधिवेशनातही केली होती मागणी
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनातही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न प्रभावीपणे मांडत धान बोनसची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते सातत्याने सभागृहात आवाज उठवत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा
पालकमंत्री असताना आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२ कोटी रुपयांचा विक्रमी पीक विमा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच मागील वर्षी २२७ कोटी रुपयांची तरतूद करून हेक्टरी २० हजार रुपयांचा धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याशिवाय २७.५२ कोटी रुपयांची धान चुकत्याची रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला होता.
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळाल्यास त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, शासन लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर
