BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

दोन हजार वर्षांपूर्वीच्या रामगड शिवगुंफेत दुमदुमला ‘हर हर महादेव’; कोंढाळी परिसर झाला शिवमय

Summary

कोंढाळी : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त कोंढाळी परिसरातील अतिप्राचीन रामगड शिवगुंफा भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेली. सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास लाभलेल्या या शिवालयात ब्रह्ममुहूर्तापासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. “हर हर महादेव”, “बंम बंम भोले”च्या घोषणांनी संपूर्ण गुंफा आणि परिसर भक्तिमय […]

कोंढाळी : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त कोंढाळी परिसरातील अतिप्राचीन रामगड शिवगुंफा भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेली. सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास लाभलेल्या या शिवालयात ब्रह्ममुहूर्तापासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. “हर हर महादेव”, “बंम बंम भोले”च्या घोषणांनी संपूर्ण गुंफा आणि परिसर भक्तिमय झाला.
पहाटेपासूनच शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, बेलपत्र अर्पण आणि मंत्रोच्चार सुरू होते. गुंफेतील नैसर्गिक प्रतिध्वनीमुळे प्रत्येक घोष अधिक दणदणीत ऐकू येत होता. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत पूजा-अर्चना केली, तर युवकांनी भक्तिगीतांच्या तालावर वातावरण भारावून टाकले.
रामगड गुंफेसह खापा, मासोद, खैरी, पुसागोंदी (लहान ढगा) आणि चंदन पारडी (शिवगडबड्या) येथील शिवालयांमध्येही दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. शिवतांडव स्तोत्र, “नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय…” यांसारख्या मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसरात अध्यात्मिक ऊर्जा जाणवत होती.
यावेळी आमदार चरणसिंग ठाकूर यांनी उपस्थित राहून शिवपूजनात सहभाग घेतला. त्यांनी भगवान शंकराच्या चरणी वंदन अर्पण करून नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे भक्तांमध्ये विशेष उत्साह संचारला. तसेच सलील देशमुख यांनीही शिवपूजन करून भक्तांना शुभेच्छा दिल्या.
कोंढाळीतील प्रभाग क्रमांक १७ मधील भादे लेआऊट नागोबा मंदिरात उपवासधारक भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले. साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, चिक्की-पापडी, मठ्ठा आदी पदार्थांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवण्यात आले. गावोगावी शिवभक्तांनी एकमेकांना “हर हर महादेव” म्हणत अभिवादन करत ऐक्याचा संदेश दिला.
महाशिवरात्रीचा हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता सामाजिक एकात्मतेचा आणि परंपरेचा संगम ठरला. श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक सहभागामुळे कोंढाळी परिसरातील वातावरण दिवसभर शिवमय झाले होते. प्राचीन रामगड शिवगुंफा पुन्हा एकदा भक्तिभावाच्या महासागराने न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *