देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
Summary
मुंबई, दि. 9 : देशाचे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार श्री. सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले आहेत. संसदीय परंपरा अधिक सक्षम करण्यासाठी, संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी उपराष्ट्रपतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या अनुभवाचा […]

मुंबई, दि. 9 : देशाचे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार श्री. सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले आहेत. संसदीय परंपरा अधिक सक्षम करण्यासाठी, संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी उपराष्ट्रपतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या अनुभवाचा देशाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, श्री. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत राहिले आहेत. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचा झालेला विजय ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. श्री. राधाकृष्णन यांचा हा विजय ‘एनडीए’च्या एकजुटीचा आणि लोकांच्या केंद्र सरकार वरील विश्वासाचा, भारतीय संविधानाच्या मूल्यांचा विजय आहे. देशातील लोकशाही संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी ते निश्चितच योगदान देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
****