दीक्षाभूमी की प्रचारभूमी…
Summary
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर आणि चंद्रपुरात लाखो दीन दलित दुबळ्यांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जागतिक क्रांती घडविली.त्यानंतर देशभरातील बौद्धांसाठी नागपूर आणि चंद्रपूरची दीक्षाभूमी म्हणजे एक तिर्थस्थळ झाले आहे. वर्षातून एकदा या भूमीवर नतमस्तक होण्यासाठी लाखो बौद्ध बांधव दोन्ही ठिकाणी येतात.भगवान […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर आणि चंद्रपुरात लाखो दीन दलित दुबळ्यांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जागतिक क्रांती घडविली.त्यानंतर देशभरातील बौद्धांसाठी नागपूर आणि चंद्रपूरची दीक्षाभूमी म्हणजे एक तिर्थस्थळ झाले आहे. वर्षातून एकदा या भूमीवर नतमस्तक होण्यासाठी लाखो बौद्ध बांधव दोन्ही ठिकाणी येतात.भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांना मानवंदना देतात.हीच गर्दी हेरून आता मात्र भाजपने आयोजकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. नागपुरात त्यांचा डाव उधळला गेला मात्र चंद्रपुरात त्यांनी दीक्षाभूमी कवेत घेत पुढील रणनीती काय असणार याची मांडणी केली.
दरवर्षी दीक्षाभूमी लाखो भीमपाखरांनी ओतप्रोत भरून जाते.करोनाच्या दोन वर्षांच्या काळात सर्व धर्मांचे कार्यक्रम थांबले होते, यावर्षी मात्र सर्वत्र ते साजरे झालेत.नागपुरात दसऱ्याला धम्म चक्र परिवर्तन दिन लाखो लोकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामुळे साहजिकच चंद्रपुरात 15 व 16 ऑक्टोबरला प्रचंड गर्दी उसळली जाईल याची कल्पना सर्वानाच होती.आयोजकांनी तसे नियोजनही केले.पत्रिका सर्वत्र व्हायरल झाली.त्यामुळे आंबेडकरी अनुयायी दीक्षा भूमीवर येण्यासाठी सज्ज झाले. त्याच कालावधी मध्ये शहरात भाजपचे बॅनर झळकले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आनंद शिंदे आणि वैशाली माडे यांची धम्म संध्या आयोजित केल्याची वार्ता आजच्या नवं माध्यमातून गावोगावी पोहचली. आणि यावेळेस गर्दी दुप्पट होईल याची खात्री पटली.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे वतीनेपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच तो आयोजित केला.सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास काहीही विरोध नाही, पण ती वेळ चुकीची होती हे मात्र खरे.
चंद्रपूर दीक्षाभूमीवर दरवर्षी होणारे कार्यक्रम वैचारिक खाद्य पुरवीत असतात.आयोजक बौद्ध धर्माच्या तत्वानुसार कार्यक्रमांची मांडणी करतात. भदंत नागार्जुन सुराई ससाई हे खास उपस्थित राहून बौद्धांना मार्गदर्शन करतात. बाबासाहेबांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेतले जाते. विविध मान्यवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. एकंदरीत बौद्ध उपासकांना पुढील दिशानिर्देश केले जाते.रात्री बुद्ध भीम गीतांचा छोटेखानी कार्यक्रम असतो.दरवर्षी हे होत असते.
यावर्षी प्रचंड जनसमुदाय जमणार हे स्पष्ट होते.दिक्षाभूमीची क्षमता साधारणतः 50 हजार लोकांची गर्दी पेलेलं एवढीच आहे.बाजूला उड्डाणपुला झाल्याने जागा अपुरी झाली आहे. त्यामुळे आनंद शिंदे-वैशाली माडे यासारख्या राज्यातील सुप्रसिद्ध गायकांना पाचारण करून आणखी वाढणारी गर्दी खरंच पेलेलं का याचा साधा विचार शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केला नाही.
खरंतर आपोआप येणारा जनसमुदाय आपल्या कवेत घेण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतला असावा. त्यासाठीच दोन मंच तयार झालेत.सर्वत्र बॅनर लावले गेले.मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री विराजमान होते.
दीक्षाभूमीवर आजपर्यंत कधीच भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशिवाय दुसऱ्यांना कोणतेही स्थान नव्हते.मात्र यावेळेस या पायंडा मोडल्या गेला. आतापर्यंत अनेक सरकार आलीत पण त्यांनी कधीच दीक्षाभूमीवर आपली प्रतिमा मोठी करण्याचा प्रयत्न केला नाही पण आता ती सुरुवात झाली आहे.
आयोजकांनी यावेळेस दोन्ही दिवस रात्री भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र वेळेवर त्यात बदल करुन आनंद शिंदे आणि वैशाली माडे यांना पचारण करण्यात आले. त्यामुळे प्रचंड गर्दी वाढली.16 ऑक्टोबर ला सायंकाळी 7 नंतर दीक्षाभूमीवर प्रवेश करणे म्हणजे एक आव्हान होते. म्हातारे आणि लहानं मुले यांचा श्वास प्रवेशद्वारावर कोंडत होता,अनेकांनी आतमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला.आंबेडकरी अनुयायी गर्दी आणि पुढील संभाव्य धोका लक्षात घेऊन आत न जाता बाहेरूनच दीक्षाभूमीला नमन करत होते. लोकांनी स्वतः गर्दीला समजून समजूतदारपणा दाखविला. अन्यथा चेंगराचेंगरी झाली असती.पोलिसही शांतपणे गर्दीला नियंत्रित करत होते.
दीक्षाभूमीवर उसळणारा जनसमुदाय लक्षात घेता सेलेब्रिटीना पाचारण करणे खरच आवश्यक होते का?सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला एवढी कणव होती तर हाच कार्यक्रम ते दोन चार दिवसांनी बाजूच्या क्लब ग्राउंड वर आयोजित करू शकले असते.मात्र दिक्षाभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयाणांवर प्रभाव टाकण्यासाठी संघ विचारांची शाल पांघरूण देण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे.
कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानावर अशा पध्दतीने आक्रमक केले जात नाही, मात्र वेळेस हा प्रकार नागपुरात होणार होता. पण तेथील बुद्धिवादी लोकांनी तो हाणून पाडला. चंद्रपुरात ही हिम्मत झाली कारण येथील बुद्धिवादी सध्या बाबासाहेबांच्या कृपेने प्राप्त झालेले आर्थिक सोयीसुविधेत गर्क झाले आहेत.अर्थात ते झोपले असले तर झोपेचे सोंग घेऊन नक्कीच नाहीत.त्यांच्या स्वाभिमानाला आणखी धक्का लागला तर ते नक्कीच पेटून उठतील.अर्थात सांस्कृतिक कार्य विभागाच्या या प्रकाराने दोन दिवसीय अनुवर्तन महोत्सवाचे संपूर्ण श्रेय दरवर्षी मुख्य आयोजकांना जाते पण यावेळेस हा संपूर्ण महोत्सव सुधीर मुनगंटीवार यांनीच हायजॅक केल्याचे दिसून आले. त्यामुळे
दिक्षाभूमीला प्रचारभूमी बनविण्याचे षडयंत्र यापुढे आणखी होणार आहेत.मात्र राजकीय पक्षांनी राजकारण करताना तरी धार्मिक स्थळांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, जेणेकरून त्यांची जी प्रतिमा जनमानसात झाली आहे, ती आणखी खालावणार नाही या दिशेने वाटचाल करावी.
अरविंद खोब्रागडे
चंद्रपूर
9850676782