दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हास्तरावर आढावा -सचिव तुकाराम मुंढे
Summary
मुंबई, दि. १ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर सविस्तर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली. सचिव मुंढे म्हणाले, […]
मुंबई, दि. १ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर सविस्तर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.
सचिव मुंढे म्हणाले, जिल्हा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न व तक्रारी ऐकून त्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या उपाध्यक्षतेखाली विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या तक्रारी, त्यावर घेण्यात आलेले निर्णय तसेच करण्यात आलेली कार्यवाही यांचा सविस्तर अहवाल आयुक्त, दिव्यांग कल्याण तसेच शासनास सादर करण्यात येणार आहे. बैठकीदरम्यान शासनस्तरावर निर्णय किंवा कार्यवाही आवश्यक असलेल्या मुद्द्यांसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर निर्णय घेण्यास मदत होणार आहे.
दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक गरजांचा विचार करून सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहकार्याने विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमधून आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध होणार असून, या उपक्रमांमुळे दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील, असे सचिव मुंढे यांनी सांगितले.
0000000
