दावोस येथील उद्योगांच्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी करण्यात राज्य प्रथम -उद्योगमंत्री उदय सामंत तीन वर्षात ६२ हजार नवउद्योजक, जिल्हा उद्योग परिषदेद्वारे राज्यात अधिकची १.२५ लाख कोटींची गुंतवणूक
Summary
मुंबई, दि.१५: दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यामध्ये देशात महाराष्ट्र पहिले राज्य आहे. यावर्षी दावोस येथे १५ लाख ७४ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहे. या उद्योगस्नेही वातावरणामुळे राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत मागील ३ […]

मुंबई, दि.१५: दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यामध्ये देशात महाराष्ट्र पहिले राज्य आहे. यावर्षी दावोस येथे १५ लाख ७४ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहे. या उद्योगस्नेही वातावरणामुळे राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत मागील ३ वर्षात ६२ हजार नव उद्योजक निर्माण झाले आहेत. देशात पहिल्यांदा उद्योग क्षेत्रावर श्वेत पत्रिका महाराष्ट्र राज्यात काढण्यात आली. उद्योग क्षेत्राच्या समतोल विकासाकरिता राज्य शासन काम करीत आहे असे उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नियम २९३ अन्वये मांडलेल्या ठरावावर उत्तर देताना सांगितले.
उद्योग मंत्री म्हणाले, उद्योजकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा उद्योग परिषद उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून यावर्षी १ लाख कोटींच्या वर गुंतवणूक झाली आहे.
गेली तीन वर्ष सातत्याने राज्यात परकीय गुंतवणुक येण्याचा ओघ वाढत आहे. रिलायन्स उद्योग समूह राज्यात विमान निर्मिती उद्योग आणत आहे. याबाबत बैठक घेण्यात आली असून शासनाच्यावतीने जमीन देण्यात येणार आहे. हा प्रकल्प राज्यातच सुरू करण्याचा शासनाचा पुरेपूर प्रयत्न आहे.
गडचिरोली या नक्षलग्रस्त ओळख असलेल्या जिल्ह्यात १ लाख कोटी गुंतवणूक असलेल्या स्टील उद्योग आल्यामुळे औद्योगिक जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख निर्माण होत असल्याचे सांगत मंत्री सामंत म्हणाले, ८ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे देकार पत्र उद्योगांना देण्यात आले आहे. मधाचे गाव योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अमरावती मध्ये पीएम मित्रा वस्त्रोद्योग पार्क उभारण्यात येत आहे. रत्नागिरी येथे सेमी कंडक्टर उद्योग आणि ‘ डिफेन्स क्लस्टर’ ची निर्मिती करण्यात येत आहे.
राज्यात मागणीनुसार आवश्यकतेप्रमाणे औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी हजारो एकर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात नवीन औद्योगिक वसाहती सुरू करण्यात येतील. उद्योजकांना ताकद व उद्योगांच्या विकासासाठी राज्य शासन तत्पर आहे, अशी ग्वाही उद्योग मंत्री सामंत यांनी दिली.
देशातील सर्वात चांगले साहित्य म्युझियम राज्यात निर्माण करणार – मराठी भाषा मंत्री उदय सामंत
राज्यात कुठेही मराठीचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. याबाबत शासन कठोर भूमिका घेत आहे. मराठीचा प्रचार प्रसारासाठी देशातील सर्वात चांगले साहित्य म्युझियम महाराष्ट्रात करण्यात येणार आहे अशी माहिती, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत नियम 293 अन्वये उपस्थित केलेल्या ठरावावर उत्तरात दिली .
मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, देशातच नाही, तर जगभरात मराठीच्या प्रचार – प्रसारासाठी राज्य शासन काम करीत आहे. त्या अंतर्गत विश्व मराठी संमेलनाचे आयोजनही करण्यात आले आहे. यावर्षीचे विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जगभरात मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व 74 देशांमध्ये बृहन्मराठी मंडळाची स्थापना करण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ 17 ठिकाणी ही मंडळे कार्यरत आहेत. तसेच तरुणांसाठी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येईल.
०००