दारू व जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा कडक प्रहार ₹6.43 लाखांचा मुद्देमाल जप्त; जिल्ह्यात खळबळ
Summary
भंडारा:- जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत दारू व जुगार अड्ड्यांवर एकाचवेळी धाडी घातल्या. या कारवाईत एकूण ₹6,43,830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिल्ह्यातील अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील अवैध […]
भंडारा:- जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत दारू व जुगार अड्ड्यांवर एकाचवेळी धाडी घातल्या. या कारवाईत एकूण ₹6,43,830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिल्ह्यातील अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर, भंडारा, कारधा, तुमसर, साकोली व अडयाळ पोलीस ठाण्याच्या पथकांनी ही निर्णायक कारवाई केली.
दारू अड्ड्यांवर धडक कारवाई
भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवन सजन वासनिक (वय 31) याच्याकडून 10 लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली.
कारधा पोलीस ठाण्यांतर्गत अचल भैय्यादास डोंगरे याच्याकडून 220 किलो मोहफुलाचा सडवा (₹22,000 किमतीचा) हस्तगत करण्यात आला.
तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या 20 वर्षीय आरोपी अभिषेक राजेश गुर्वे याच्याकडून तब्बल 4,100 किलो रासायनिक मोहपास जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ₹6,15,000 आहे. ही कारवाई अत्यंत गंभीर मानली जात आहे.
साकोली परिसरात देशी दारूचा साठा जप्त
साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धाडीत अनेक आरोपींकडून देशी दारूचे पव्वे, प्लास्टिक बाटल्या व टिल्लू जप्त करण्यात आले. या प्रकरणात पुरुषांसह महिलाही आरोपी म्हणून आढळून आल्या असून एकूण शेकडो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जुगार अड्ड्यांवरही पोलिसांचा हात
तुमसर व अडयाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यांवर छापे टाकत वरली मटका सट्टापट्टी, रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण ₹2,030 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाचा ठाम इशारा
संपूर्ण कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्यांचे ठाणेदार व पोलीस अंमलदारांनी संयुक्तरित्या पार पाडली.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अवैध दारू व जुगार व्यवसाय करणाऱ्यांवर भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असून कायद्याला न जुमानणाऱ्यांना कुठलीही माफी दिली जाणार नाही.
संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
