दक्षता व नियंत्रण समितीच्या मार्फत तातडीने प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत सात नव्या सदस्यांची समितीवर नियुक्ती
नागपूर, दि. 30 : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीपुढे आलेल्या सर्व प्रकरणाचा तातडीने निर्णय व्हावा. ज्या प्रकरणात आर्थिक मदत द्यावयाची आहे ती विनाविलंब दिली जावी, अशा सूचना ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिल्या. पालकमंत्र्यांनी यावेळी नवनियुक्त सदस्यांचे स्वागतही केले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये छत्रपती भवनात आज झालेल्या बैठकीत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर निवड झालेल्या राजेंद्र करवाडे, हरिष रामटेके, डॉ. प्रोफेसर शेषराज क्रिष्णा गजभिये, अजय टेकाम, फकिरा कुळमेथे, सुनिता जिचकार, विनोद जिवतोडे या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार अभिजीत वंजारी, जिल्हाधिकारी विमला आर., महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश कुमार ओला, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश काटकर यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पोलीस तपासातील प्रकरणे, आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती, विविध प्रकरणांमध्ये मंजूर झालेल्या अर्थसहाय्याची माहिती, पालकमंत्र्यांनी घेतली. प्रलंबित प्रकरणे गतिशील पद्धतीने निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. नवनियुक्त सदस्यांसोबत संवाद साधला.
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध उपाययोजना राज्य शासन आखत असते. राज्य शासनाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम 1995 नुसार सुधारणा केली आहे. ही सुधारणा महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली आहे. या अधिनियमामध्ये अत्याचार झालेल्या घटनांबाबत प्रथम खबर नोंदविणे, तपासाचे अधिकार, चौकशी करणे, दक्षता समिती मार्फत नियंत्रण ठेवणे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लोकांवर झालेल्या अन्यायाबाबत नुकसान भरपाई देणे, त्यांचे पुनर्वसन करणे, या संदर्भातले निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अन्यायग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई व पुनर्वसन करण्याबाबत कारवाई व्हावी, यासाठी या दक्षता समितीने लक्ष घालावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्र्यांनी केले.
डॉ. हर्डीकर यांचा पुतळा उभारण्याची पूर्तता त्वरित करावी – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश
काँग्रेस सेवादलचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉ. ना. सु. हर्डीकर यांच्या पुतळा उभारण्याच्या संदर्भात असलेल्या अडचणी कालबद्ध कालावधीत पूर्ण कराव्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.
डॉ. ना. सु. हर्डीकर स्मृती प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी आज पालकमंत्री डॉ. राऊत यांची भेट घेतली. यावेळी आमदार अभिजीत वंजारी, जिल्हाधिकारी विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, डॉ. ना. सु. हर्डीकर स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार पांडे, काँग्रेसचे नेते मोहम्मद कलाम उपस्थित होते.
डॉ. ना. सु. हर्डीकर यांनी 1923 मध्ये काँग्रेस सेवादलाची स्थापना केली होती. त्यांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. सेवादलाच्या स्थापनेला पुढील वर्षी १०० वर्षे होणार आहे. या निमित्ताने डॉ. हर्डीकर यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या पुतळ्याच्या जागेच्या संदर्भात असलेल्या सर्व ना हरकत प्रमाणपत्रांची पूर्तता येत्या 8 दिवसात पूर्ण करावी, असे निर्देश डॉ. राऊत यांनी यावेळी दिले. पुतळ्याची जागेची नव्याने पाहणी करून अहवाल सादर करावे, असेही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी निर्देश दिले.
00000
गुरू गोविंदसिंग स्टेडीयमच्या नामांतराला मंजुरी
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
ऑटोमेटीव्ह चौकात असलेल्या गुरु गोविंदसिंग स्टेडीयमचे नामांतर आता गुरु गोविंदसिंग सेंटर असे करण्याला संमती देण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
गुरुद्वार गुरुनानक दरबारच्या प्रतिनिधींनी आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली. गुरु गोविंद सिंग स्टेडीयम असल्याने शिख समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन नामांतर करण्याला संमती देण्यात आली आहे. यामुळे शिख समाजाच्या संगत व लंगरचे कार्यक्रमांचे आयोजन विनासायास होण्यात हरकत राहणार नाही, असेही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या या सूचनेला प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी संमती दिली. यावेळी आमदार अभीजीत वंजारी, जिल्हाधिकारी विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, मलकियतसिंग, गुरुविंदर सिंग, कुक्कु मारवाह, जसमित सिंग भाटिया, कंवलजीत चौहान, टोनी जग्गी उपस्थित होते.
नागपुरात नवे ट्रांसपोर्ट नगर होणार; ट्रकच्या पार्किंगसाठी अस्थाई जागा देणार
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे नागपूर ट्रक असोशिएशनला आश्वासन
नागपुरात ट्रक पार्किंगसाठी कायम व्यवस्थेसाठी नवे ट्रांसपोर्टनगर होणार असून तोपर्यंत अस्थायी व्यवस्था त्वरित करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.
नागपूर ट्रक असोशिएशनच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री डॉ. राऊत यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. सध्या नागपुरात ट्रक पार्किंगची व्यवस्था नसल्याने दिवसा केवळ दुपारी 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी आहे. यामुळे ट्रक चालकांना त्रास होत असल्याचे नागपूर ट्रक असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात संपूर्ण दिवसभर ट्रकच्या रहदारीला परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, ट्रक पार्किंगसाठी कायम व्यवस्था होईपर्यंत अस्थायी व्यवस्था करण्यासाठी जागा सुचवावी, या जागेवर अस्थायी स्वरुपाची व्यवस्था करण्यात येईल.
कायम स्वरुपाच्या नवीन ट्रांसपोर्ट नगरसाठी सुद्धा सूचना कराव्या, यात लॉजीस्टिक, इतर नागरी सुविधा, दवाखाना व ट्रक चालकांच्या सोई सुविधा लक्षात घेऊन जागा सूचवावी, यासाठी देशात ट्रक पार्किंग असलेल्या शहरांची माहिती घ्यावी, असेही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सुचविले. यावेळी कुक्कू मारवाह, मलकियत सिंग, जसमित सिंग भाटीया, कंवलजीत चौहान, पप्पू गोत्रा, टोनी जग्गी उपस्थित होते.