तुमसर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भक्कम पाऊल आमदार राजू कारेमोरे व नगराध्यक्ष इंजि. सागर गभणे यांच्या हस्ते 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण
तुमसर | प्रतिनिधी
तुमसर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, शहरातील प्रमुख चौक व वर्दळीच्या ठिकाणी 40 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले. या कॅमेऱ्यांचे उद्घाटन आमदार राजू कारेमोरे व नवनियुक्त नगराध्यक्ष इंजि. सागर गभणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
शहरातील वाढती लोकसंख्या, वाहतूक, चोरी-छेडछाड व कायदा-सुव्यवस्थेच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आमदार राजू कारेमोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून व नगराध्यक्ष इंजि. सागर गभणे यांच्या कार्यतत्परतेतून हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे.
14 प्रमुख ठिकाणी सुरक्षा कवच
नगरपरिषदेमार्फत शहरातील अत्यंत वर्दळीच्या 14 प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामध्ये
राजाराम हॉल परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती समोर (हसरा फाटा), मोठा बाजार, सिहोरा रोड, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, शिवाजी रोड, शिव मंदिर चौक, माळीव नगर, लोटन पोहा चौक, पिपरा रोड, जैन मंदिर परिसर, बोरी रोड व पतंजली रोड या ठिकाणांचा समावेश आहे.
या सर्व कॅमेऱ्यांचे निरीक्षण एका केंद्रीय नियंत्रण कक्षातून करण्यात येणार असून, त्यामुळे गुन्हेगारी घटनांवर तात्काळ कारवाई शक्य होणार आहे.
गुन्हेगारीवर वचक, वाहतुकीवर नियंत्रण
सीसीटीव्ही प्रणालीमुळे शहरातील चोरी, छेडछाड, वाहतूक नियमांचे उल्लंघन व अन्य गैरप्रकारांवर पोलिसांना तात्काळ लक्ष ठेवता येणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नगराध्यक्ष इंजि. सागर गमणे यांनी सांगितले की,
“शहराचा विकास करत असताना नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. आमदार राजू कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर शहर अधिक सुरक्षित व सुव्यवस्थित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
मान्यवरांची उपस्थिती
या लोकार्पण सोहळ्यास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बापटे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सतीश सोनवणे, तसेच नगरपरिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
नागरिकांकडून स्वागत
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मुख्य चौकांवर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. आमदार व नगराध्यक्षांच्या पुढाकारामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे कौतुक केले आहे.
🔴 Police Yoddha News Network
तुमसर शहर आता अधिक सुरक्षिततेकडे एक पाऊल पुढे
