तुमसर परिसरात गोवंश वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; 27 बैलांची सुटका, ₹13.80 लाखांचा मुद्देमाल जप्त
तुमसर | प्रतिनिधी
प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तुमसर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला. या कारवाईत 27 गोवंशीय बैलांची सुटका करण्यात आली असून सुमारे ₹13.80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 9 जानेवारी 2026 रोजी पहाटे 1.30 ते 2.30 वाजताच्या सुमारास मौजा खापा परिसरात जिल्हा व उपविभागीय गस्त सुरू असताना तुमसर पोलीस स्टेशनचे पो. हवा. टेकाडे यांना तिरोडा येथून तुमसरकडे एका आयशर ट्रकमधून अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांनी पोलीस पथकासह नाकाबंदी केली.
नाकाबंदी पाहताच संशयित आयशर ट्रकचालकाने ट्रक रस्त्यावर उभा करून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो फरार झाला. त्यानंतर पंचासमक्ष ट्रकची पाहणी केली असता टाटा कंपनीचा आयशर ट्रक (क्र. MH 40 BD 2468) आढळून आला. ट्रकच्या डब्यात अत्यंत कोंडीत, निर्दयतेने 27 गोवंशीय बैल कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आले.
या कारवाईत अंदाजे ₹10 लाख किमतीचा आयशर ट्रक व ₹3.80 लाख किमतीचे गोवंशीय जनावरे असा एकूण ₹13.80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी फरार ट्रकचालक व वाहनमालकाविरुद्ध पोलीस स्टेशन तुमसर येथे अपराध क्रमांक 17/2026 अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5, 5(अ), 5(ब), 9 तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा कलम 11(1)(ड) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक त्रिभुवन पटले करत असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. गोवंश संरक्षण व प्राण्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी तुमसर पोलिसांची ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
