तुमसर उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचाराचा विळखा; नागरिकांमध्ये संतापाची लाट
Summary
भंडारा, २६ जून २०२५ – भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या या उपविभागात शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध सेवांसाठी अनावश्यक त्रास सहन करावा लागत […]

भंडारा, २६ जून २०२५ – भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या उपविभागीय कार्यालयात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या या उपविभागात शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध सेवांसाठी अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपानुसार, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, नोंदणी कामे तसेच जमीन संबंधित प्रकरणांमध्ये कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून खुलेआम लाच मागितली जात आहे. काही प्रकरणांमध्ये एजंट किंवा दलालांची मदत घेण्याचेही दबाव टाकले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित विभागाकडून वेळेवर सेवा न मिळाल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज, शेतकऱ्यांचे पीकविमा तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ यामुळे रखडले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. जर प्रशासनाने दुर्लक्ष केले, तर जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिला आहे.